कोल्हापूर : मंगळवारी गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सोने-चांदी, कपडे व इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल इत्यादी वस्तू ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यासाठी व्यावसायिकांनी दुकानांमध्ये माल भरला असून, या काळात दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी व व्यावसायिकांवर कारवाई करू नये, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.यानंतर पत्रकारांशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, गुढीपाडव्याच्या निमित्ताने दुकानांमध्ये माल भरलेला आहे. या दिवशी मालाची विक्री झाली नाही तर मोठे नुकसान होईल, तसेच जीएसटीचे रिटर्न दंड, बँकांच्या कर्जाचे हप्ते, व्याज वेळोवेळी नाही भरले तर खाती एनपीएमध्ये जाऊन क्रेडिट खराब होते. कामगारांचा पगार, हॉटेल भाडे, लाइट बिल, पाणी बिल हा खर्च चालूच आहे. तरी सर्व व्यापारी आस्थापने उघडण्यासाठी परवानगी मिळावी, तसेच दुकाने सुरू ठेवलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करू नये, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे.यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, राजू पाटील, किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रदीप कापडिया, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, प्रशांत शिदे, राहुल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, संभाजी पोवार उपस्थित होते.