कोल्हापूर : गाय दूध दरकपातीवरून ‘गोकुळ’चे राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून, निषेध मोर्चा यशस्वी करण्यासाठी संचालकांनी कंबर कसली आहे. गावोगावी डिजिटल फलकांच्या माध्यमातून मोर्चात सहभागी होण्यासाठी दूध उत्पादकांना आवाहन केले जात असून ‘दूध संघाला बदनाम करणाºया राजकारणातील बोक्यांना रोखा’ या आशयाचे फलक मात्र चर्चेचा विषय बनला आहे.
आमदार सतेज पाटील यांनी गाय दूध दरकपातीचा मुद्दा उपस्थित करत ‘गोकुळ’च्या संचालकांबरोबरच नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मोर्चा काढून ‘पांढºया दुधातील काळे बोके’, ‘ संचालक कसले नंदीबैलच’ अशी शेलकी विश्लेषणे देऊन संचालकांवर कडाडून टीका केली होती. ही टीका संचालकांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात मेळावे, बैठका घेऊन उत्पादकांचे प्रबोधन सुरू आहे.
सतेज पाटील यांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी गावोगावी डिजीटल फलक लावले होते. फलकांच्या माध्यमातून त्यांनी ‘पांढºया दुधातील, काळे बोके’ अशी टीका केली होती. त्याचे उत्तर म्हणून सत्तारूढ गटाने वाहतूक संघटना, प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटना, गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटना, गोकुळ नागरी पतसंस्था यांच्या नावाने गावोगावी फलक लावले आहेत.
‘गोकुळ’ची विकृत पद्धतीने चालवलेली नाहक बदनामी रोखण्यासाठी गुरुवारच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या फलकांबरोबरच ‘गोकुळला बदनाम करणाºया राजकारणातील बोक्याना रोखा’ असे मांजराचा फोटो दाखवून प्रतिउत्तर दिले आहे. गावातील चौकात लागलेल्या या फलकांची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.महिलांच्या सहभागासाठी प्रयत्नदूध व्यवसाय महिलांच्या हातात असल्याने त्यांनीच मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गुरुवारच्या मोर्चात महिलांंची संख्या जास्त असेल.‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्पादकांनी सहभागी होण्याचे आवाहन करणारे फलक लावले आहेत; ...राजकारणातील बोक्यांना रोखा’ या फलकाची जोरात चर्चा सुरू आहे.