कोल्हापूर : शहरात खड्डे बुजविण्यासाठी पॅचवर्क करू नका, तर नवीन दर्जेदार रस्ते करा अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाने गुरुवारी दिला. रस्ते तातडीने करण्याच्या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले.महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले म्हणाले, शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. सुरू असलेले पॅचवर्कचे काम निष्कृष्ट आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवणारी समिती असली पाहिजे. ठेकेदारांना पैसे देता, ते जनतेच्या करातून जमलेले असतात. प्रशासन हे पैसे फुकट घालवीत आहे.
यावेळी अभिषेक देवणे यांनी, शहरातील रस्ते पूर्णपणे नवीन करण्याशिवाय पर्याय नाही. खराब रस्त्यांविरोधात महापालिकेला घेराव घालणे, खड्ड्यांची लग्ने, महारस्ता रोको अशी आंदोलने करणार असल्याचा इशारा दिला.
यावेळी विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, अशोक जाधव, इंद्रजित आडगुळे, नीलेश हंकारे, धनाजी यादव, भारत चव्हाण, दिनमहंमद शेख, रियाज जमादार, प्रकाश कांदळकर, उस्मान मिरजकर, तानाजी पाटील, शामराव पाटील, संजय पाटील, पोपट रेडेकर, पुष्पक पाटील, वसंत पाटील उपस्थित होते.
पर्यटकांचे स्वागत खड्ड्यांनी करायचे काय?शहरवासीयांना खराब रस्त्यांचा त्रास होतच आहे; पण शहरात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागतच खड्ड्यांनी होत आहे. सध्या पॅचवर्क करताना डांबराचा अत्यंत कमी वापर केला जातो. त्यावर क्रशर पावडर मारल्याने खड्डा भरल्यासारखा दिसतो; पण चारच दिवसांत पुन्हा खडी निघून जाते आणि खड्डा मोठा होतो. हे प्रकार थांबवून दर्जदार काम करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात, असे राजू जाधव यांनी सांगितले.दहा दिवसांत रस्ते करूसततच्या पावसामुळे रस्ते करण्यास विलंब झाला. सध्या पॅचवर्कची २९ कामे सुरू झाली आहेत; तर १४२ कामे मंजूर असून त्यांतील तीन-चार रस्त्यांची कामे लवकरच सुरू होतील. उद्या, शनिवारपासून महापालिकेचे डांबराचे प्लँट सुरू होतील. त्यानंतर प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम वेगाने करण्यात येईल. आठ ते दहा दिवसांत रस्त्यांची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.