कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दर्शनासाठी जाताना तुम्ही चुडीदार ड्रेस घालून आल्यास श्रीपूजक प्रवेश करू देणार नाहीत, कारण देवीची तशी परंपरा आहे म्हणून तुम्ही साडी नेसून देवीच्या दर्शनाला जावे, अशी सूचना येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना केली. त्यांनी त्यास नकार दिला असून आपण चुडीदार घालूनच मंदिरात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मंदिर प्रवेशाचा गुंता सुटल्यावर आता ड्रेसकोडवरून नवा वाद सुरू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मात्र चुडीदार की साडी असा कोणताही वाद नसून महिलांना मुक्तपणे दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, असे जाहीर केले आहे.अंबाबाई मंदिरात पाचशे महिलांसह आपण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार असल्याचे श्रीमती देसाई यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तोपर्यंत स्थानिक महिलांनी काल सोमवारीच मंदिर प्रवेश करून त्यांच्या आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु देसाई या आपण देवीचे दर्शन घेण्यावर ठाम होत्या. आज देवीच्या दर्शनाचा मुद्दा त्यांनी कोणता पेहराव करावा या दिशेने गेला. देसाई आज बुधवारी येणार आहेत म्हणून त्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक देशमुख यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेचे संभाषण देसाई यांनी ध्वनिमुद्रित केले व ते सोशल मीडियावर शेअर केले. वृत्तवाहिन्यांवरूनही या वादाला राज्यभर तोंड फुटले.दुपारी तीन वाजता देशमुख यांनी हा फोन केला होता. त्यामध्ये देसाई यांनी आपण तीन वाजता कोल्हापुरात येणार असल्याचे व ताराराणी चौकातून रॅलीने मंदिरात येणार असल्याचे जाहीर केले. देशमुख म्हणाले,‘ मंदिर प्रवेशावरून गेली आठ-दहा दिवस सुरू असलेला वाद आम्ही सामोपचाराने मिटविला आहे. प्रशासनाची महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास कोणतीच हरकत नाही. आमचा विरोध नाही; परंतु मंदिरात प्रवेश करण्याच्या काही परंपरेने चालत आलेल्या अटी व प्रथा आहेत. त्या आपण पाळाव्यात. आपण दर्शनासाठी साडी नेसून यावे.’ देसाई म्हणाल्या, ‘चुडीदार घालून दर्शनासाठी येऊ नये असे कशात लिहिले आहे. मी कधीच साडी वापरत नाही. त्यामुळे मी चुडीदार घालूनच येणार आहे. मी शॉर्ट अथवा जिन्स घालून आली तर आक्षेप असल्यास समजू शकते परंतु मी देखील कोल्हापूरची आहे, विदेशी नाही. त्यामुळे मी चुडीदार घालूनच येणार आहे. प्रवास करुन येणाऱ्या महिलांच्या सोयीचा विचार करावा.’ देशमुख म्हणाले, ‘श्रीपूजकांची आम्ही काल बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनुसार आम्ही दर्शनासाठी ठराविक वेळ देण्याचे नियोजन करत आहोत. आमची एक विनंती आहे की तुम्ही साडी परिधान केली तर वाद होणार नाही. कारण श्रीपूजक म्हणतात की पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे. साडी घालूनच दर्शन दिले जाते.’मंदिराचा गाभारा छोटा आहे. देवीच्या अंगावर किमती दागिने आहेत. मूर्तीचे रासायनिक संवर्धन झाले आहे. या गोष्टींचा विचार करून आत जास्त गर्दी होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. महिलांना आत जाऊन जरूर दर्शन घ्यावे. ही शाहू महाराजांची नगरी आहे व आम्हालाही महाराष्ट्राला एक चांगला संदेश द्यायचा आहे.’-अनिल देशमुख, पोलीस निरीक्षकसाडीच घालून या असा उल्लेख कुठेच नाही. देवीचे पावित्र्य राखण्यास आम्हीही बांधील आहोत परंतु लांबचा प्रवास करून माझ्यासह अनेक भक्त येतात, त्यातील बहुतेकजण पंजाबी ड्रेस घालतात. त्यामुळे त्यांना अडविले जाऊ नये. मी चुकीचे कपडे घातले तर तुम्ही मला नक्की आडवा हे माझेही मत आहे. आम्ही सुरुवातीला शिष्टमंडळाने जाऊ. कोणताही वाद होईल असा व्यवहार आमच्याकडून होणार नाही.’-तृप्ती देसाई, भुमाता ब्रिगेड
साडीच पाहिजे चुडीदार नको!
By admin | Published: April 13, 2016 12:27 AM