कागल : गेली चार-पाच वर्षे तुम्ही-आम्ही कोठे आहोत, जगलो की वाचलो आहोत, याची साधी चौकशीही न करणारे विरोधक आता निवडणूक आल्यानंतर मते तेवढी मागायला येत आहेत. माझ्या विरोधात लढण्याची भाषा करीत आहेत. मी माझ्या माता-भगिनींसाठी गेल्या पाच वर्षांत हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी केले आहे. खूप राबलो आहे. हे माझे कष्ट वाया जाऊ देऊ नका, आया-बहिणींनो, माझा सांभाळ करा, मला वट्यात घ्या, असे भावनिक आवाहन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, शनिवारी भव्य महिला मेळाव्यात केले. कागल विधानसभा मतदारसंघातील महिलांचा मेळावा येथील अलका शेती फार्मजवळ आयोजित करण्यात आला होता. ५० हजारांच्या आसपास संख्येने महिलांनी हजेरी लावली होती. महिलांची प्रचंड गर्दी बघून भावना अनावर झालेल्या मुश्रीफ यांनी हे आवाहन केले. अध्यक्षस्थानी महानंदच्या अध्यक्षा वैशाली नागवडे होत्या. ते म्हणाले की, कागल विधानसभा मतदारसंघातील आया-बहिणींचा आशीर्वाद मला लाभल्यानेच मी १५ वर्षे आमदार १४ वर्षे मंत्री बनलो आहे. वेदगंगा-दूधगंगा नदीला आलेला महापूर मी यापूर्वी पाहिला, पण आज येथे महिलांचा आलेला महापूर पाहून माझे मन उचंबळून आले आहे. या महापुरात विरोधक वाहून जातील. अरुंधती महाडिक म्हणाल्या की, महिलांची इच्छा नसली की, त्या काहीतरी कारण सांगून गैरहजर राहतात, पण येथे उसळलेली गर्दी म्हणजे मुश्रीफ यांना पाठिंबा देण्यासाठी महिलांचा उत्स्फूर्तपणाच आहे. वैशाली नागवडे म्हणाल्या, एका मतदारसंघातील एका नेत्यासाठी इतक्या महिला एकत्र येण्याचा हा प्रसंग मी पहिल्यांदाच पाहत आहे. महाराष्ट्रात मुश्रीफ यांच्यासारखा मंत्री नेता आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अशा आया-बहिणी मी दुसरीकडे पाहिलेल्या नाहीत. मुश्रीफ यांचा विजय निश्चित झाला आहे. यावेळी महापौर तृप्ती माळवी, मनीषा डांगे, भारती पोवार, शैलजा पाटील, शीलाताई जाधव, नबीला मुश्रीफ, अमरिन मुश्रीफ, शारदा आजरी, शैलजा पाटील, शोभाताई फराकटे, भाग्यश्री कांबळे, हेमलता संकपाळ, मनीषा पाटील, नेहा पाटील आदींची भाषणे झाली. स्वागत गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी, प्रास्ताविक कागलच्या नगराध्यक्षा आशाकाकी माने यांनी, तर मुरगूडच्या नगराध्यक्षा माया चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास युवराज पाटील, भय्या माने, संगीता खाडे, सायरा मुश्रीफ, नवीद मुश्रीफ, आदी उपस्थित होते.
केलेले कष्ट वाया जाऊ देऊ नका
By admin | Published: September 21, 2014 1:17 AM