कोल्हापूर : तरुण संशोधकांना जागतिक पातळीवर नावलौकिक करण्याची संधी निर्माण झाली आहे. ते लक्षात घेऊन आपण फक्त देशाचेच नागरिक नसून जगाचे नागरिक आहोत, या भावनेने त्यांनी संशोधन कार्य करावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ सिंगापूरचे (संशोधन) उपाध्यक्ष प्रा. सीराम रामकृष्ण यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठ आणि नवी दिल्लीतील इंटरनॅशनल स्टडिज इन टेक्निकल एज्युकेशन (आएसटीई)तर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘बिल्डिंग इनोव्हेशन अॅन्ड इंटरप्रिन्युअरशीप’ असा त्यांच्या विषय होता. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार होते. ‘आयएसटीई’चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई प्रमुख उपस्थित होते.देसाई म्हणाले, सध्या देशातील उच्च तंत्रशिक्षण क्षेत्र एका कठीण प्रसंगातून जात आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा अभाव जाणवत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य शिक्षकांनी केले पाहिजे. विद्यापीठ सांगते म्हणून आपण संशोधन करतो तर संशोधन अंत:करणापासून झाले पाहिजे. पवार म्हणाले, नावीन्यपूर्ण संशोधनवृत्ती जोपासणे विद्यार्थ्यांनी जोपासावी. त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी, ड्रोन, थ्रीडी प्रिटिंग अशा नव्या क्षेत्रात संशोधन करावे. कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, एस. एन.भोसले आदी उपस्थित होते. ए. के. साहू यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी आभार मानले. संशोधनाला सहकार्य व्याख्यानानंतर प्रा. रामकृष्णा यांनी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे आदींसमवेत चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील संशोधनाबाबत काही मदत लागल्यास संपर्क साधा, नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ सिंगापूर तसेच अन्य संस्थांच्या माध्यमातून सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.
जगाचे नागरिक समजून संशोधन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2016 12:37 AM