कोल्हापूर : नियमानुसार ज्या स्कूल बसेसचालकांनी अद्यापही आपल्या बसेस पुनर्तपासणी करून घेतलेली नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. विशेष म्हणजे शिक्षणसम्राट, सामान्य वाहनमालक असा भेदभाव न करता एकसारखी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्याकडे केली.गेले काही दिवस शहरासह जिल्ह्यातील स्कूल बसेसच्या पुनर्तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यातील अनेक स्कूल बसेस मालकांनी, संस्थांनी आपल्या बसेसची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मे महिन्याच्या सुट्टीत तपासणी करून घेतलेली नाही.
अनेक बसचालकांकडे त्यांचे लायसेन्सही नाही. यासह ड्रेस कोड, महिला मदतनीस, अग्नी प्रतिबंधक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी हे बसमध्ये नाही. त्यामुळे ऐनवेळी काही घटना घडली तर अनर्थ होईल. अद्यापही असे स्कूल बसचालक, मालकांनी आपल्या बसेस योग्य आहेत की नाहीत याची पुनर्तपासणी करून घेतलेली नाही.
यासह अयोग्यरीत्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवरही कारवाई करावी; पण शिक्षणसम्राटांना एक व सर्वसामान्य रिक्षाचालकांना एक असा भेदभाव न करता सर्व दोषी वाहनचालकांना योग्य ती समान कारवाई करावी, यासह ज्या शाळा विद्यार्थ्यांना रिक्षा व बसेसचालकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडतात, त्या शाळांवरही कारवाई करावी.
जेणेकरून त्या शाळा ही वाहने आपल्या शाळेच्या आवारात उभी करतील. ज्या शाळा सूचना पाळणार नाहीत, त्यांच्यावर जिल्हा स्कूल समितीद्वारे कारवाई करावी, आदी मागण्यांबाबत यावेळी उपस्थितांसोबत चर्चा झाली.जे स्कूल बसेसचे मालक नोटीस अथवा तोंडी कळवूनही दाद देणार नाहीत, त्यांच्या बसेसवर कारवाई करून त्या अटकावून ठेवल्या जातील.
जे वाहनचालक नियमांचे पालन करणार नाहीत, अशा सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. यात कोणत्याही प्रकारे दुजाभाव केला जाणार नाही, असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले. सोबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारीस, मोटारवाहन निरीक्षक ए. के. पाटील, आदी उपस्थित होते.शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजीराव जाधव, युवा सेना जिल्हाधिकारी हर्षल सुर्वे, रिक्षा सेना संघटक राजू जाधव, जिल्हा वाहतूक सेनेचे संघटक दिनेश परमार, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, सुनील पोवार, संजय जाधव, विनायक केसरकर, सागर गायकवाड, राजू यादव, धनाजी यादव, शिवाजी पाटील, विकी मोहिते, सुरेश तुळशीकर, संदीप पाटील, दिलीप जाधव, अरुण पाटील, चंद्रकांत भोसले, संजय गोरे, साताप्पा शिंगे, अभिजित बुकशेट, आदींचा समावेश होता.