कोल्हापूर कोरोनाच्या प्रमुख लक्षणांमध्ये शरीरातील रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे प्रमुख लक्षण आहे; परंतु हीच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचे अनेकांना उशिरा समजते आणि मग उपचारासाठी धावाधाव सुरू होते. म्हणूनच आता ‘घरच्या घरी सहा मिनिटे चालणे’ अर्थात वॉक टेस्टवर आरोग्य विभाग भर देत आहे.
अशा पद्धतीने नागरिकांनी दैनंदिन अशी घरच्या घरी चाचणी केली, तर आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीची माहिती नागरिकांना होईल आणि त्यातूनच मग नेमके पुढे काय केले पाहिजे, याचीही दिशा सापडेल, असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.
...अशी करावी चाचणी
१) घरात चालायला सुरुवात करण्यापूर्वी पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजन किती आहे याची नोंद करून ठेवावी.
२) ऑक्सिमीटर लावूनच घरात सहा मिनिटे चालावे. मात्र, पायऱ्यांवर चालू नये.
३) चालल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनची पातळी नोंदवावी.
४) सहा मिनिटे चालल्यानंतरही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही, तर आपली तब्येत उत्तम असल्याचे समजावे.
५) जरी ही पातळी एक, दोन टक्क्यांनी कमी झाली तरी घाबरून न जाता दिवसातून दोन वेळा ही चाचणी न करता, सातत्याने पातळी कमी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
चौकट
कोणी करायची ही चाचणी
ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या किंवा कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवणाऱ्यांनी ही चाचणी करावी. गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांनीही ही चाचणी करावी.
चौकट
...तर घ्या काळजी
सहा मिनिटे चालल्यानंतर जर ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी आली किंवा चालणे सुरू करण्यावेळी जी पातळी होती त्यापेक्षा तीन टक्क्यांपेक्षा पातळी कमी झाल्यास किंवा धाप लागत असेल, तर किंवा दम लागत असेल, तर ऑक्सिजन अपुरा पडत आहे, असे समजावे व रुणालयात दाखल व्हावे.
कोट
सर्वसामान्य कोणालाही ही चाचणी करणे सहजशक्य आहे. यातून आपली ऑक्सिजन पातळी कमी हाेत आहे, याची माहिती होईल आणि वेळेत रुग्ण रुग्णालयात दाखल हाेऊ शकेल.
-डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी