कोल्हापूर : राधानगरी धरणातील पाणीसाठा संपल्यानंतर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला म्हणून पाणीवाटपाचे नियोजन टंचाईच्या काळातही चांगल्या पद्धतीने झाले; परंतु आता चांगला पाऊस झाला, धरणही भरलेले आहे. त्यामुळे पूर्ववत रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी पुढे आली असून, येत्या २० आॅगस्टला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा चांगला पाऊस झाला असून, राधानगरी धरण पूर्णपणे भरले आहे. काळम्मावाडी धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. पंचगंगा नदीलाही आता पूर आला आहे. त्यामुळे शहरात रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी पुढे येत आहे. बहुसंख्य नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी महापौर अश्विनी रामाणे यांची भेट घेऊन रोज पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनास आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. बुधवारी महापौर रामाणे यांनी जलअभियंता मनीष पवार यांच्याशी या विषयावर चर्चा करून माहिती घेतली. सध्या पाणी आहे, त्यामुुळे प्रशासनास काही अडचणी नसल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. तरीही महापौरांनी यावर येत्या महासभेत चर्चा करून, सर्वांच्या सूचना ऐकून घेऊन निर्णय घेऊ, असे सांगितले. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आता २० आॅगस्टनंतर केव्हाही रोज पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्णात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले. त्याला कोल्हापूर शहरवासीयांनीही प्रतिसाद देत सहकार्य केले. पाणीपुरवठा विभागाने योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे टंचाईच्या काळातसुद्धा शहरवासीयांना टंचाईच्या झळा बसल्या नाहीत किंवा पाण्यासाठी धावाधाव करावी लागली नाही. गेल्या चार-साडेचार महिन्यांत एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे चांगले परिणाम दिसून आले. पण गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी नगरसेवकांतून केली जाऊ लागली आहे. टंचाईच्या काळात शहरवासीयांनी प्रशासनास सहकार्य केले; पण आता पाणी असताना त्यांना वेठीला धरणे योग्य नाही, असा नगरसेवकांचा आग्रह आहे. पुढे जानेवारी ते मार्च या काळात परिस्थिती पाहून पुन्हा नियोजन बदलता येईल, असेही नगरसेवकांचे म्हणणे आहे. महासभेतील निर्णय काय होतो यावर प्रशासन नियोजन ठरविणार आहे. (प्रतिनिधी)६८ लाखांची झाली बचत!एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे धोरण महानगरपालिकेच्या चांगलेच पथ्यावर पडले. राधानगरी धरण आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना शहरातील नागरिकांना पुरेशा दाबाने आणि मुबलक पाणी तर मिळालेच; शिवाय उपसा कमी केल्यामुळे विजेच्या खर्चात बचत झाली. कायमच दिवसाआड पुरवठा करा..दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे लोकांना पाणी जपून वापरण्याची सवय झाली आहे. लोकांना सध्या चांगल्या पद्धतीने पुरेसे पाणी मिळत आहे. काही अपार्टमेंटस वगळता इतरांची त्याबद्दल काहीच तक्रार नाही. त्यामुळे सध्याची व्यवस्थाच कायम ठेवावी, अशीही बहुतांशी शहरवासियांची मागणी आहे.
पाणीपुरवठा आता रोज करा
By admin | Published: August 11, 2016 12:14 AM