कोल्हापूर: स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग चाचणी करण्यावर कायद्यानं बंदी आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश झाला आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात अरविंद कांबळे हा ५५ वर्षीय डॉक्टर मातृसेवा हॉस्पिटल चालवतो. या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान केलं जात असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांना होता.
त्यामुळे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळपासून या हॉस्पिटलमध्ये एक स्टिंग ऑपरेशन राबवलं. त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अरविंद कांबळे हा डॉक्टर अलगदपणे जाळ्यात सापडला. त्यानं सोनोग्राफीसाठी २० हजार रुपये घेतल्याचंही स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं आहे.
२०१७ साली हा डॉक्टर गर्भलिंग निदान करत असल्याचे उघड झालं होतं. त्याच्यावर कारवाई करून त्याच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सील करण्यात आलं होतं. कारवाईनंतरही सोनोग्राफी मशीनचं सील काढून डॉ. कांबळे यानं गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा सुरूच ठेवला होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज स्टिंग ऑपरेशन केलं.
कांबळे यांनं २० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर गर्भलिंगनिदानही केलं. त्यानंतर पन्हाळा पोलिसांनी आरोपी डॉक्टरला रंगेहात ताब्यात घेतलं. कांबळे यांनं किती महिलांचं गर्भलिंगनिदान केलं आहे, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.