कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथील मातृसेवा हॉस्पिटलमध्ये अनधिकृत पोर्टेबल सोनोग्राफी मशिनव्दारे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉ. अरविंद कांबळे व गिरीश कुंभोजकर यांचा जामीन अर्ज पन्हाळा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. त्यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गोपनीय तक्रारीनुसार, १६ डिसेंबर २०२० रोजी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत डॉ. अरविंद सीताराम कांबळे यांच्या कोडोली येथील मातृसेवा हॉस्पिटल येथे जिल्हास्तरीय पथकामार्फत स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी एका महिलेच्या पोटातील बाळाचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीनव्दारे गर्भलिंग निदान झाल्याचे सापडले. डॉ. कांबळे यांच्यावर २०१६ मध्ये गर्भपातासंदर्भातील गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या केंद्रास पुनर्नोंदणी देण्यात आली नाही. त्यांचे सोनोग्राफी मशीन वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत सील करण्यात आले होते. असे असतानाही कांबळे अनधिकृत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनव्दारे गर्भलिंग निदान करत होते.
याप्रकरणी सर्व संबंधितांचे जाबजबाब व चौकशी पूर्ण करून वैद्यकीय अधीक्षक तथा समुचित अधिकारी ग्रामीण रुगणालय, पन्हाळा यांच्यामार्फत डॉ. कांबळे व कुंभोजकर यांच्याविरुध्द पन्हाळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते. १८ मार्च रोजी याबाबत प्रथम सुनावणी झाली. यावेळी दोन्ही आरोपींकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. हा जामीन अर्ज फेटाळून दोघांना ३१ मार्चपर्यंत न्यायालीयन कोठडी देण्याचा आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रेरणा निकम यांनी दिला.
या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनीता नाशिककर, पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, पोलीस उपनिरीक्षक विभावरी रेळेकर, पोलीस अभिजित घाडगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, पीसीपीएनडीटी वकील डॉ. गौरी पाटील, दिलीपसिंह जाधव, संजीव बोडके यांचा सहभाग होता.
--