कोल्हापूर : पोक्सो या कायद्यांतर्गत बालरोग तज्ज्ञांची महत्वाची भूमिका आहे. तपासणीसाठी आलेल्या बालकावर लैंगिक अत्याचाराची शंका आली तर बालकाला विश्वासात घेऊन त्याची आस्थेने चौकशी करावी व कोणाच्याही दबावाखाली न येता गुन्हा दाखल करावा, असे मत शारीरबोध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजश्री साकळे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, डॉक्टरांनी १०९८ या चाइल्ड हेल्पलाइनवर फोन करून किंवा पोलिसांना बोलावून पीडित बालकाला कायदेशीर मदत मिळवून द्यावी. बऱ्याच वेळी प्रतिष्ठेखातर पालक तक्रार न करण्याची डॉक्टरांना गळ घालतात तेव्हा त्यांचे समुपदेशन करून पोलिसांना बोलावून घ्यावे. डॉक्टरांनी तक्रार नोंदवली नाही तर तो गुन्हा आहे. यासाठी त्यांना कैद आणि दंड होऊ शकतो.
यावेळी स्वयं शाळेतील चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या दिव्यांग स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास संघटनेच्या अध्यक्षा डॉ. संगीता कुंभोजकर, सेक्रेटरी डॉ. सुनील पाटील उपस्थित होते. डॉ. दीपा कित्तुर यांनी स्वागत केले.
--