कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कागदपत्रांवर उपअभियंत्यांची बोगस सही मारल्याचे सिध्द झाल्याने बोरवडे, ता. कागल येथील कृष्णात दत्तात्रय सूर्यवंशी या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
कागल तालुक्यातील कामांची कागदपत्रे तपासताना संबंधित उपअभियंत्याने आपण सही केली नसताना कुणीतरी सही केल्याचे उघडकीस आणले. अधिक माहिती घेता त्या कामाचा ठेकेदार सुर्यवंशी यांनीच बोगस सही मारल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
तसेच पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ येथील सागर संभाजी पाटील हा ठेकेदार मनमानी पध्दतीने टेंडर भरून नंतर माघार घेण्याासाठी पैशाची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच आजरा तालुक्यातील चिमणे येथील अभिषेक बेलकर याने काम अपूर्ण ठेवल्याने त्यालाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यांना एक वर्ष कोणतेही काम करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.