लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात रविवार (दि.२) पर्यंत एकूण ९ लाख ६६ हजार ८६ नागरिकांनी लस घेतली आहे. मात्र, शासनाकडून सध्या आवश्यकतेपेक्षा कमी लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील रांगेत थांबून नागरिक थकले आहेत. काही केंद्रांवर लस संपल्याचे फलक झळकले आहेत. त्यामुळे ‘कोणी लस देता का लस?’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात दि. १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. केंद्राकडून लसींचा मर्यादित पुरवठा होत असून देखील कोल्हापूरने लसीकरणामध्ये राज्यात चौथा क्रमांक मिळविला. आतापर्यंत कोल्हापूरमधील ८४४८२४ जणांनी पहिला डोस, तर १२१२६२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यात हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, ४६ ते ६० आणि ६० वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. वय वर्षे १८ ते ४४ गटातील नागरिकांचे लसीकरण शनिवार (दि.१) पासून प्रायोगिक स्वरूपात सुरू झाले. त्यात गेल्या दोन दिवसांत १२७० जणांनी पहिला डोस घेतला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लस घेण्याची नागरिकांची मानसिकता वाढल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून आवश्यकतेपेक्षा कमी लसींचा पुरवठा होत आहे. लसींचा तुटवडा असल्याने नागरिकांसह प्रशासनाचीदेखील अडचण होत आहे.
पॉंईटर
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण
हेल्थ केअर वर्कर
पहिला डोस : ४०२१०
दुसरा डोस : २०३३४
फ्रंटलाईन वर्कर
पहिला डोस : ५०९३९
दुसरा डोस : १७५३८
६० पेक्षा जास्त वयाचे
पहिला डोस :३८६५०९
दुसरा डोस :५७८०८
४५ ते ६० वयातले
पहिला डोस : ३६७१६६
दुसरा डोस :२५५८२
१८ ते ४४ वयातले
पहिला डोस : १२७०
कोणी काय करायचे?
४५ ते ६० वर्षे आणि त्यावरील वयोगट
या गटातील पहिला डोस असल्यास नागरिकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अपॉईंटमेंट (वार, वेळ) घ्यावी. लस घेण्यासाठी केंद्रावर जाताना सोबत स्वत:चे आधारकार्ड, छायाचित्र असलेले ओळखपत्र सोबत न्यावे. या गटातील शहरातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
१८ ते ४४ वयोगट
या गटातील शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी प्रथम कोविन पोर्टलवर नोंदणी करावी. ऑनलाईन अपॉईंटमेंट (वार, वेळ) घ्यावी. आपल्या परिसरात प्रशासनाने माहिती दिलेल्या केंद्रामध्ये लस घेण्यासाठी जावे. सोबत स्वत:चे आधारकार्ड, छायाचित्र असलेले ओळखपत्र न्यावे.
===Photopath===
030521\03kol_1_03052021_5.jpg
===Caption===
डमी (०३०५२०२१-कोल-व्हॅॅकिन डमी)