ज्योतिबा वसाहत ग्रामस्थांची आर्त हाक
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड: १ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या विक्रमी पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला चांगलीच धडकी भरवली होती व त्याच्या झळाही संपूर्ण जिल्ह्याने सोसल्या आहेत. त्याची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी राजू शेट्टींना आक्रोश पदयात्रा काढावी लागली. हे जरी खरे असले तरी ज्या तुळशी -धामणी परिसरात राज्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली, त्या परिसरात या पावसाने आपल्या पाऊलखुणा आजही जिवंत ठेवल्या आहेत. उखडलेले रस्ते, पूल, खचलेल्या पाऊलवाटा अद्यापही आहे तशाच आहेत. ज्योतिबा वसाहतीला धामोड बाजारपेठेशी जोडणारा पूल व त्याचा भरावा तुटल्याने या गावांचा संपर्कच अद्याप तुटलेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आता प्रशासनाकडे आर्त हाक दिली आहे.
केळोशी बु.॥ येथील ज्योतीबा वसाहत व केळोशी गावाला जोडणाऱ्या पुलाचा भरावा तुटून दोन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अद्याप हा भरावा करण्यात आलेला नाही. आमदार, खासदारांनी संबंधित ठिकाणी पाहणी दौरा करून प्रशासनाला सूचना केल्या असल्या, तरी अद्याप यात कोणताच फरक झालेला नाही. परिणामी, या गावचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आता रस्तादुरुस्तीची आर्त हाक दिली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार विचारणा करूनही या तुटलेल्या पुलाचा भरावा न केल्याने येथील ग्रामस्थांनी प्रत्येक कुटुंबाकाडून ५००,२०००, ३०००,५००० रुपये व बुरंबाळी, केळोशी बु.॥ ग्रामपंचायतीकडून २५००० रुपये अशा निधी संकलनाचे काम सुरू आहे. यातून आतापर्यंत ४५००० रुपये निधी जमा केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला ही चपराक असेल.