कोल्हापूर : राज्य सरकारने घातलेले सर्व निर्बंध हे केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीप्रमाणे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली नियमावली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मान्य नसतील तर तसे आम्ही पंतप्रधानांना कळवू, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी लगावला. राज्य सरकारने निर्बंध घालताना विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप आमदार पाटील यांनी केला होता. यावर मंत्री मुश्रीफ यांनी हा पलटवार केला.ते म्हणाले, राज्याने केंद्र शासनाने जाहीर केलेलेच निर्बंध लागू केले आहेत. ते नियम त्यांना मान्य नसतील तर त्यांनी आम्हाला सांगावे, आम्ही ते केंद्राला कळवू. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे सोमवारपासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील रुग्णांची संख्या देशात जास्त व ती गुणाकार पद्धतीने वाढत आहे.अन्य देशांच्या अनुभवानुसार ही लाट जेवढ्या वेगाने आली तेवढ्याच वेगाने ओसरली देखील आहे. या लाटेत ९२ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा ऑक्सिजनची गरज लागलेली नाही. पण आपली बेड व ऑक्सिजनची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या दोन - तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे.पहिल्या व दुसऱ्या लाटेत मुंबई-पुण्यातून परदेशातून लोक घाबरून गावाकडे येत होते, त्यामुळे संसर्ग वेगाने वाढत होता. आता तशी परिस्थिती नाही. तरीही ग्रामीण भागातदेखील संसर्ग वाढत असून, आता गावस्तरावर ग्राम समिती पुन्हा सक्रिय केली जाईल. शहरी भागातून तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही जबाबदारी ग्राम सभेकडून पार पाडली जाईल.
चंद्रकांत पाटील यांना मोदींचे नियम मान्य नाहीत का?, मंत्री हसन मुश्रीफ यांचा खोचक सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 11:47 AM