कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाहू छत्रपती टर्मिनन्स रेल्वे स्थानकातून कधीकाळी १७ एक्सप्रेस धावत होत्या. मात्र, कोरोना संसर्गाच्या लाटेनंतर यातील आठ एक्सप्रेसच धावत आहेत. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाटही ओसरू लागली आहे. तरीसुद्धा प्रवाशांच्या मागणीला रेल्वे प्रशासन वाटाण्याच्या अक्षता लावत आहे.
विशेष म्हणजे प्रवाशांची मागणी असलेल्या पॅसेंजर गाड्या अजूनही सुरु झालेल्या नाहीत. केवळ पॅसेंजर रेल्वेमधूनच कोरोनाचा संसर्ग होतो का? अन्य गर्दीच्या ठिकाणी होत नाही का? असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांकडून केवळ पॅसेंजर रेल्वेतून प्रवास केला तरच कोरोना होताे का? अन्य ठिकाणी गर्दी केल्यानंतर होत नाही का? असा प्रश्न प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचारला जात आहे.
कोरोना संसर्गाची पहिली लाट आल्यानंतर कोल्हापूर रेल्वे स्थानकातील सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या. काही दिवसानंतर परराज्यातील प्रवाशांना परतीचा प्रवास म्हणून श्रमिक एक्सप्रेस मागणीनुसार तीन वेळा सोडण्यात आली. पुन्हा काहीकाळ ही सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर सध्या आठ एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत तर कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-सातारा, कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-कुर्डुवाडी या चार पॅसेंजर अद्यापही बंद आहेत. सद्यस्थितीत महागाईमुळे लोकांकडे पैसे नाहीत. त्यात एक्सप्रेसने प्रवास करायचा म्हटले तर आरक्षण केल्याशिवाय प्रवास करणे शक्य नाही. थेट तिकीट खिडकीतून तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना अर्थिक फटका बसत आहे.
मग पॅसेंजर बंद का ?
एका बाजूने निर्बंध शिथील होत आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या एस. टी. महामंडळाच्या बसेसही पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. मात्र, प्रवाशांची अधिक पसंती व गरजेची असलेली पॅसेंजर रेल्वे सुरु करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अनेकांना रोजचा प्रवास पॅसेंजरमुळे सुलभ होत आहे. खिशालाही ही पॅसेंजर सेवा परवडते. त्यामुळे कोरोना संसर्गाचे कारण देऊन बंद केलेल्या चारही पॅसेंजर सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सध्या सुरु असलेल्या एक्सप्रेस (स्पेशल ट्रेन)
कोल्हापूर - मुंबई (कोयना एक्सप्रेस),कोल्हापूर - अहमदाबाद, कोल्हापूर - दिल्ली (निजामुद्दीन), कोल्हापूर - तिरुपती (हरिप्रिया), कोल्हापूर - गोंदिया, कोल्हापूर - नागपूर, कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी), कोल्हापूर - धनबाद यांचा समावेश आहे. याच एक्सप्रेसना स्पेशल ट्रेन म्हणून संबोधले जात आहे.
बंद असलेल्या उर्वरित एक्सप्रेस, पॅसेंजर अशा
राणी चन्नमा (मिरजेहून), कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - सातारा, कोल्हापूर - कुर्डुवाडी, कोल्हापूर - मिरज, कोल्हापूर - सांगली अशा पॅसेंजर, तर कोल्हापूर - मुंबई (सह्याद्री), कोल्हापूर - सोलापूर, कोल्हापूर - हैदराबाद या गाड्यांचा समावेश आहे.
चौकट
गेल्या महिनाभरापासून रेल्वे स्थानकप्रमुख रजेवर आहेत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना काही विचारणा करायची असेल तर कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे.
प्रतिक्रिया
कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटेनंतर आता बंद झालेल्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या सुरु होणे गरजेचे आहे. अनेकांना पॅसेंजर रोजच्या प्रवासासाठी कमी खर्चात मोठा आधार आहेत. त्यामुळे सर्व बंद झालेल्या रेल्वे पुन्हा प्रशासनाने प्राधान्यक्रमाने सुरु कराव्यात.
- शिवनाथ बियाणी, सदस्य, मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समिती, पुणे