धनंजय महाडिकांची फसवणूक कदमांना दिसत नाही का?, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:42 AM2022-03-15T11:42:37+5:302022-03-15T11:43:17+5:30
राजकीय आकसापोटी सतत आरोप करण्याचे काम करणाऱ्या सुनील कदम यांनी महापौरपदाच्या कालावधीत शहरातील सर्वाधिक आरक्षण उठविण्याचा विक्रम केला. त्यामुळे कदमांची कोल्हेकुई म्हणजे चाेराच्या उलट्या बोबा आहेत.
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील व त्यांच्या कुटुंबीयांच्या घरफाळ्याचे कोणतेही प्रकरण थकीत नाही. त्यांनी रीतसर घरफाळा भरलेला आहे. तरीही निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या कदम बंधूंना माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मिळकतींच्या बाबत महापालिका प्रशासनाची केलेली फसवणूक दिसत नाही का, असा सवाल सोमवारी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पत्रकारांशी बाेलताना केला.
पालकमंत्री पाटील व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित सयाजी हॉटेलसह अन्य मिळकतींचे पुन्हा एकदा फेरसर्वेक्षण करावे आणि आवश्यकता भासल्यास नियमानुसार घरफाळा आकारणी करावी, तसेच कदम बंधूंचे नातेवाईक असलेल्या माजी खासदार महाडिक यांच्या संबंधित आम्ही देत असलेल्या मिळकतींचेही सर्वेक्षण करून नियमाप्रमाणे घरफाळा आकारणी करावी, अशा दोन्ही मागण्या सोमवारी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. त्यानंतर पत्रकारांना माहिती दिली.
प्रशासक बलकवडे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, निलोफर आजरेकर, संजय मोहिते, अर्जुन माने, संदीप नेजदार, मोहन सालपे, सागर यवलुजे, दुर्वास कदम, अश्पाक आजरेकर, विजय सूर्यवंशी यांचा समावेश होता.
राजकीय आकसापोटी सतत आरोप करण्याचे काम करणाऱ्या सुनील कदम यांनी महापौरपदाच्या कालावधीत शहरातील सर्वाधिक आरक्षण उठविण्याचा विक्रम केला. त्यामुळे कदमांची कोल्हेकुई म्हणजे चाेराच्या उलट्या बोबा आहेत. माजी खासदारांनी शहरात बांधलेल्या मालमत्तेच्या घरफाळ्यात कितीतरी अनियमितता आहे. त्याच्या माध्यमातून होणारे नुकसान कदमांना का दिसत नाही, असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.
लक्ष्मीपुरीतील भीमा वस्त्रम, स्टेशन रोडवरील कैलास टॉवर, ताराबाई पार्कमधील कृष्णा सेलिब्रिटी, शिवाजी पार्क येथील किंग्ज काेर्ट या इमारतींच्या बाबतीत महापालिकेचे नुकसान झाले आहे. गोदामे बांधल्याचे दाखवून जागेचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत आहे. किंग्ज कोर्ट इमारत तर रस्त्यावर बांधून विकण्यात आली. त्या शेजारी असणारी पालिकेची खुली जागा जाण्या-येण्यासाठी वापरली जात आहे, याकडेही निवेदनात लक्ष वेधले आहे