गणपती कोळी-कुरुंदवाड -शहराच्या मध्यभागी असलेले तबक उद्यान पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले आहे. त्यामुळे दलदल आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून, प्रेक्षक गॅलरीच्या बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांनी नासाडी झालेला माल मैदानातच टाकल्याने दुर्गंधी सुटली आहे. शहराच्या वैभवासाठी तबक उद्यानात कोट्यवधी रुपये खर्च करून जिम्नॅशियम हॉल व प्रेक्षक गॅलरी उभारली आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे या मैदानाला घाणीचे स्वरूप आले आहे.संस्थानकाळापासून हे उद्यान तबक उद्यान म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर शहरातील पावसाच्या पाण्याने तलाव पूर्णपणे भरलेला असतो. कालांतराने पावसाचे प्रमाण घटल्याने तसेच पालिकेने पाणी काढून दिल्याने उद्यान उन्हाळ्यामध्ये कोरडे पडू लागले. शहराच्या मध्यभागी असलेल्या या जागेत जिम्नॅशियम हॉल व प्रेक्षक गॅलरीसाठी आरक्षण बांधकामही पूर्ण केले.मैदान जमिनीपासून १० ते १२ फूट खोलीवर असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. मात्र, अद्यापही पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाही. गेल्या वर्षभरात साधना मंडळ, श्री स्पोर्टस्, राष्ट्र सेवा दल आदींनी कबड्डी, व्हॉलिबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्याने व मैदानाची चांगली काळजी घेतल्याने मैदान सुस्थितीत होते. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये कोणत्याही स्पर्धा न झाल्याने व पालिकेचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने हिरवी गवती वेलींनी मैदानाचा ताबा घेतला आहे. त्यातच गतआठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने मैदान पाण्याने तुडुंब भरले आहे. पालिकेने केलेल्या निचरा योजनेतून पाणी निचरा होत नसल्याने तसेच पाणी तुंबून राहिल्याने दलदल व घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
कुरुंदवाडच्या तबक उद्यानात घाणीचे साम्राज्य
By admin | Published: September 24, 2015 11:18 PM