कोल्हापूर : भक्तांकडे पाहुणचार घेण्यासाठी येणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांचा घरगुती उत्सव यंदा सहा दिवसांचा असणार आहे. यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाचा उत्साह कमी असला तरी देव घरी येणार म्हणून घरोघरी आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.गणपती बाप्पा म्हणजे आबालवृद्धांचा लाडका देव. महाराष्ट्रात घरोघरी आणि सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो. मात्र गतवर्षी महापूर आणि यंदा कोरोनाने सणाच्या उत्साहावर पाणी फिरविले आहे. यंदा जल्लोषाला उधाण येणार नसले तरी देवाचे आगमन, धार्मिक विधी आणि त्यानिमित्ताने मांगल्याचे वातावरण घरोघरी असणार आहे. येत्या शनिवारी (दि. २२) गणेशचतुर्थी असून त्याआधीपासूनच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. यंदा हा घरगुती उत्सव सहा दिवसांचा असणार आहे.हरितालिका पूजन (शुक्रवार, दि. २१) : गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका पूजन केले जाते. कुमारिका व सुवासिनी हे व्रत करतात. या दिवशी वाळूपासून शंकराच्या पिंडीची स्थापना केली जाते. कुमारिका इच्छित वर मिळावा म्हणून; तर सुवासिनी अखंड सौभाग्य व समृद्धीसाठी ही पूजा करतात. दिवसभर व्रतस्थ राहून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो.गणेशचतुर्थी (शनिवार, दि. २२) : या दिवशी घरोघरी तसेच मंडळांमध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी घरामध्ये दुपारपर्यंत प्रतिष्ठापना, आरती व नैवेद्य हे धार्मिक विधी केले जातात. सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची सायंकाळी प्रतिष्ठापना केली जाते.गौरी आवाहन (मंगळवार, दि. २५) : गणेश आगमनानंतर तीन दिवसांची गौरी आवाहन होणार आहे. या दिवशी पाणवठ्याच्या ठिकाणी कळशीत गौरीच्या डहाळ्या पुजून घरी आणल्या जातात. ह्यसोनियाच्या पावलांनी घरी गवर आलीह्ण म्हणत तिची गणपतीशेजारी प्रतिष्ठापना केली जाते. आल्या दिवशी हिरवी पालेभाजी, वडी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी उशिरा उभ्या मूर्तींची पूजा उभारून त्यांचा साजश्रृंगार केला जातो.गौरीपूजन (बुधवार, दि. २६) : गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केले जाते. या दिवशी शंकरोबाचेही आगमन होते. घरोघरी पुरणपोळीचा बेत असतो. या परिवारदैवतांचे पूजन करून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी हळदी-कुंकूचे आयोजन केले जाते.ज्येष्ठा गौरी विसर्जन (गुरुवार, दि. २७) : या दिवशी घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन केले जाते. सकाळी देवांची नैवेद्य दाखवून आरती झाली की विसर्जनाला सुरुवात होते. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगतो. यंदा मात्र कोरोनामुळे नागरिकांच्या एकत्र येण्यावर बंदी आहे; त्यामुळे आपापल्या परिसरातच गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.
घरगुती गणेशोत्सव यंदा सहा दिवसांचा, शुक्रवारी हरितालिका पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 1:59 PM
भक्तांकडे पाहुणचार घेण्यासाठी येणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांचा घरगुती उत्सव यंदा सहा दिवसांचा असणार आहे. यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाचा उत्साह कमी असला तरी देव घरी येणार म्हणून घरोघरी आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
ठळक मुद्देघरगुती गणेशोत्सव यंदा सहा दिवसांचाशुक्रवारी हरितालिका पूजन