कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल या इंधनांमुळे आधीच महागाईचा वणवा पेटला असताना आता घरगुती गॅसच्या दरात तब्बल ५० रुपयांनी वाढ करून केंद्र सरकारने वणव्यात आणखी भर टाकली आहे. घरगुती गॅसच्या एका टाकीचा दर कोल्हापुरात ७७३ वर पाेहोचला आहे. विशेष म्हणजे एवढा दर वाढूनही यावर मिळणारी सबसिडी मात्र केवळ २ रुपये आहे. दोन महिन्यांत २०० रुपयांची वाढ झाल्याने किचन बजेटचे बारा वाजले आहे. आधीच किराणा मालासह खाद्यतेलही महागल्याने फोडणी महागल्याने खिसा रिकामा झाला असताना गॅसच्या वाढीमुळे महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा याची विवंचना घरोघरी वाढली आहे.
लाॅकडाऊन काळात घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता, पण अनलॉक सुरू झाल्यानंतर नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने आणि एक महिन्याऐवजी दर पंधरा दिवसांनी दरात वाढ सुरू केली. एक डिसेंबरला ५० रुपयांची वाढ झाली. पाठोपाठ जानेवारी महिन्यात सलग वाढ करून ही रक्कम १५० रुपयांच्या घरात गेली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विनाअनुदानितपणे २५, तर १५ फेब्रुवारीला घरगुतीमध्ये ५० रुपयांची घसघशीत वाढ केली. दर पंधरा दिवसांनी ५० रुपयांच्या पटीत दर वाढत असल्याने गेल्या दोन महिन्यात हा आकडा २०० रुपयांच्यावर पाेहोचला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये ५७६ रुपयांवर असणारा घरगुती गॅस आता ७७३ वर पोहोचला आहे.
चौकट ०१
२०० रुपयांच्या वाढीनंतर २ रुपयांचे अनुदान
मागील वर्षी एप्रिलमध्ये आजवरचा सर्वाधिक ७८९ रुपये असा घरगुती गॅसचा दर झाला होता, पण तेव्हा सबसिडी मिळत असल्याने प्रत्यक्षात ही रक्कम ६००च्या घरात होती, पण आता केंद्र सरकारने सबसिडीच देणे बंद करून टाकले आहे. यावर फारच चर्चा सुरू झाल्यानंतर मागील महिन्यापासून सबसिडीचे संदेश मोबाईलवर पडू लागले आहेत, पण त्यावरची रक्कम पाहिल्यावर सरकारच्या धोरणावर हसावे की रडावे हेच सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे. एका टाकीवर २ रुपये १ पैसे इतके अनुदान दिले जात आहे. २०० रुपयांची वाढ करून २ रुपये अनुदान देणाऱ्या केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात जनतेच्या मनात संतापाची लाट आहेे.