कोल्हापूर : आपल्या आगमनामुळे भक्तांच्या आयुष्यातील ताणतणाव दूर करून त्यांना सुख, समृद्धी व आनंदाची अनुभूती देणाऱ्या लाडक्या गणरायाला आणि त्यांच्यासोबत आलेल्या गौराई आणि शंकरोबा या परिवार देवतांना आज, शनिवारी निरोप द्यावा लागणार आहे. यानिमित्त पंचगंगा नदीघाटावर रंकाळा, इराणी खण, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कळंबा या जलाशयांच्या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी या कुंडांत मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका व स्वयंसेवी संस्थांतर्फे करण्यात आले आहे. आज, शनिवारी होणाऱ्या घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिका व स्वयंसेवी संस्थांतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंचगंगा नदीघाट येथे महापालिकेतर्फे भक्तांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केलेल्या भक्तांना ‘सुजाण कोल्हापूरकर’ हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती ठेवण्यासाठी ८० फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. गणेशमूर्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी यंदा प्रथमच रॅकची व्यवस्था करण्यात आली आहे. गौरी - गणपती विसर्जनस्थळी नागरिकांनी दान केलेले निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे १८ पथके तयार करण्यात आली असून, त्यातील एक पथक फक्त प्लास्टिकचा कचरा स्वतंत्रपणे गोळा करील; तर इतर १७ पथके निर्माल्य गोळा करतील. यासाठी आरोग्य विभागातर्फे ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोळा करण्यात येणारे निर्माल्य ‘अवनि’ व ‘एकटी’ या संस्थांना वाशी येथे खत तयार करण्यासाठी दिले जाणार आहे. दान केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिकेतर्फे इराणी खणीमध्ये करण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीच हे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे २०० कर्मचारी पुरविले जाणार आहेत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी अग्निशमन विभागाचे ५० कर्मचारी व रेस्क्यू बोट तैनात केली जाणार आहे. विद्युत विभागातर्फे मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशा प्रकाशझोताचे प्रकाशदिवे लावण्यात येणार आहेत. ‘व्हाईट आर्मी’चे ५० जवान तैनात दरवर्षीप्रमाणे यंदाही व्हाईट आर्मी संस्थेचे ५० जवान पंचगंगा नदीघाट, रंकाळा तलाव, कळंबा तलाव, कोटीतीर्थ तलाव येथे तैनात असणार आहेत. नदी-तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी भाविकांनी गणेशमूर्ती विसर्जन कुंडात विसर्जितकरावी; तसेच निर्माल्य दान करावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. जलाशयांच्या ठिकाणी कुंडांची सोय पंचगंगा नदी तसेच तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी व पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पंचगंगा घाट संवर्धन समितीने नदीघाटावर सहा विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. तसेच रंकाळा, इराणी खण, कोटीतीर्थ, कळंबा, रुईकर कॉलनी या ठिकाणीही विसर्जन कुंडे असणार आहेत. या सर्व ठिकाणी आरतीसाठी टेबलांची सोय असणार आहे. याशिवाय समाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांच्यातर्फेही प्रायव्हेट हायस्कूल- खासबाग, महावीर गार्डन, कोटीतीर्थ येथे काहिली ठेवण्यात येणार आहेत. कसबा बावड्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळातर्फे राजाराम बंधारा येथे मूर्तिदान उपक्रम राबविण्यात येणार आहे. बेलबाग येथील मंगेशकरनगरमधील गणेश विहार (गंजीवाली खण) येथे विसर्जन कुंड, मूर्तिदान कुंड, निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. केआयटी कॉलेज आणि न्यू पॉलिटेक्निकचे विद्यार्थी राजाराम तलाव येथे थांबून गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि मूर्तिदानाचे आवाहन करणार आहेत. कळंबा तलाव या ठिकाणी कळंबा ग्रामपंचायत मूर्तिदानासाठी आवाहन करणार असून, विसर्जनासाठी काहिली उपलब्ध करून देणार आहे. शिवाजी पार्क येथे नगरसेवक आशिष ढवळे हे पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी विक्रम हायस्कूलच्या पटागंणात दोन काहिली ठेवणार आहेत.‘पीओपी’चा लगदा नापीक शेतीसाठी पीओपीची मूर्ती अमोनियम बायकार्बोनेटमध्ये विरघळविण्याचा प्रयोग यंदा पर्यावरणप्रेमी संस्था, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. मूर्ती विरघळलेला लगदा हातकणंगलेमधील हिंगण, शिरोळमधील हेरवाड, करवीरमधील वसगडे या तीन गावांतील प्रत्येकी तीन गुंठे नापीक जमिनीसाठी खत म्हणून वापरण्यात येणार आहे. जमिनीची सद्य:स्थिती, हे खत घातल्यानंतर येणारे पीक व त्यानंतर जमिनीचा पोत, या सगळ्याचे निरीक्षण करण्यात येणार आहे. विसर्जनाचे व्हिडिओ शूटिंग कुंडात विसर्जन झालेल्या गणेशमूर्तींचे व्यवस्थित विसर्जन होत नाही, अशी भक्तांमध्ये भीती असते. आपली गणेशमूर्ती धार्मिक पद्धतीनेच विसर्जित केली जाते, याबद्दल भक्तांना विश्वास वाटावा यासाठी पंचगंगा घाट संवर्धन समितीतर्फे दान केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन होतानाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. े...कोटीतीर्थमध्ये गणेशमूर्ती विसर्जन नकोराजारामपुरी येथील कोटीतीर्थ तलाव परिसर स्वच्छ व सुंदर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला सर्व थरांतून साथ मिळत आहे. तरी आज, शनिवारी गणेशमूर्तींचे विसर्जन या तलावात न करता या परिसरात व्यवस्था करण्यात आलेल्या तीन विसर्जन कुंडात करावे, असे आवाहन सेव्ह कोल्हापूर सिटीझन कमिटी, पंचगंगा संवर्धन समिती, श्रीराम फौंड्री, शिवाजी विद्यापीठ, न्यू पॉलिटेक्निक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन नदी, तलावात नकोपंचगंगा नदीसह अन्य जलसाठ्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी घरगुती गणपतींचे विसर्जन हे या ठिकाणी न करता जिल्हा परिषद व महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आलेल्या काहिली व कुंडांमध्ये करावे. निर्माल्याचेही दान करावे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही नदी किंवा तलावामध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी प्रशासनाने व्यवस्था केलेल्या खणीमध्ये करावे. पंचगंगेचे प्रदूषण थांबणे गरजेचे असून, यामध्ये सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारीमी माझ्या घरच्या गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करत नाही. पंचगंगा नदी घाटावर जाऊन मूर्तीची विधिवत पूजा करतो आणि कुंडात मूर्ती विसर्जित करतो. आपली नदी आधीच खूप प्रदूषित झाली आहे. याच नदीचे पाणी आपण पितो. त्यामुळे तिची स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरी नागरिकांनी आपल्या गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कुंडात विसर्जन करावे.- खासदार धनंजय महाडिक सुख-समृद्धीचे प्रतीक असलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन कुंडात करावे. तसेच निर्माल्यदेखील नदीत न टाकता निर्माल्य संकलन केंद्रांवर देऊन महापालिकेला सहकार्य करावे. - महापौर अश्विनी रामाणेगणेशमूर्ती शाडूची असेल तर नागरिकांना ती घरच्या घरीच विसर्जित करता येणार आहे. मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसची असेल तर विसर्जनासाठी पर्यायी विसर्जन कुंडाचा वापर करावा. निर्माल्य, नैवेद्य जलाशयात न टाकता गरजूंना द्यावा. - उदय गायकवाड (पर्यावरणतज्ज्ञ)
घरगुती गौरी-गणपतीचे आज विसर्जन
By admin | Published: September 10, 2016 12:44 AM