कोल्हापूर : मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेचा गावपातळीवरील राजकारणात किती दबदबा आहे, हे गोकूळ निवडणुकीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. विजयी झालेले २१ पैकी तब्बल ७ संचालक हे जिल्हा परिषदेचे आजी माजी पदाधिकारी आहेत. त्यातही शाहू आघाडीतील चार विजेत्यांपैकी तीन जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी आहेत. आता सत्तेत आलेल्या शाहू शेतकरी आघाडीचे चार शिलेदार जिल्हा परिषद गाजवणारेच आहेत. उर्वरित तीन नेत्यांच्या वारसदारांना जिल्हा परिषदेत पहिल्या प्रयत्नात हुकलेला गुलाल गोकुळने मिळवून देत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषद ही कायमच नवे नेतृत्व घडवणारी शाळा राहिली आहे. येथे सदस्य म्हणून आलेले पुढे खासदार, आमदार, मंत्री झाले. जिल्ह्याच्या, तालुक्याच्या राजकारणात स्वत:चा दबदबा तयार करत अनेक संस्थांमध्ये वर्चस्वही मिळवले. गोकुळ दूध संघ तर जिल्हा परिषद गाजवणाऱ्या आजी, माजी सदस्यांना कायमच खुणावत राहिला. त्यांचे नेटवर्कही उत्तम असल्याने नेत्यांनाही असे सदस्य सोबत असणे महत्त्वाचे ठरते. त्यातूनच यावर्षी उमेदवारी मागताना आजी माजी सदस्यांची रांगच दोन्ही आघाड्यांकडे लागली होती. त्यातून निवडकांना आणि नेत्यांच्या वारसदारांनाच संधी मिळाली. यात आजी, माजी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेल्यांपैकी ९ जणांना प्रत्यक्ष उमेदवारी मिळाली. त्यात सात जणांना यश मिळाले. आता विरोधी बाकावर बसलेल्या आघाडीत निवडून आलेल्या चारपैकी तिघे संचालक हे जिल्हा परिषदेशी संबंधित आहेत. त्यातही शौमिका महाडिक, अंबरीश घाटगे हे जिल्हा परिषदेत विद्यमान सदस्य असून मागील अडीच वर्षांच्या काळात त्यांनी अध्यक्ष आणि शिक्षण सभापतीपद भूषवले आहे. बाळासाहेब खाडे दुसऱ्यांदा संचालक झाले आहेत, तत्पूर्वी ते जिल्हा परिषदेत सभापती होते. आता सत्ताधारी बनलेले एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, अंजना रेडेकर, अमरसिंह पाटील यांनी जिल्हा परिषदेत एक काळ गाजवला आहे. अमर पाटील व तायशेटे हे दोघेही शिक्षण सभापती होते. एस. आर. पाटील व रेडेकर हे सदस्य होते.
चौकट
जिल्हा परिषदेने नाकारले, गोकुळने स्वीकारले
चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील या तिघांनी चार वर्षांपूर्वी एकाचवेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती; पण नेत्यांचे वारसदार म्हणून झालेल्या अपप्रचारामुळे पराभव स्वीकारावा लागला होता; पण हेच तिघे वारसदार एकाच वेळी गोकुळचे संचालक झाले आहेत.
चौकट
समान धागा....सभापतीपदाचा
जिल्हा परिषदेची पार्श्वभूमी असलेले आणि गोकुळमध्ये संचालक झालेले अमर पाटील, बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे, अभिजीत तायशेटे यांच्यात एक समान धागा आहे. हे चौघेही जिल्हा परिषदेत अर्थ व शिक्षण सभापती होते. अर्थ सभापती या नात्याने जिल्हा परिषदेच्या आर्थिक चाव्याच त्यांच्या हातात होत्या.