इंदुमती गणेश ।कोल्हापूर : अतिवृष्टी, महापुराने कोल्हापूरचे प्रचंड नुकसान झाले असले तरी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. महापुरानंतर अवघ्या महिन्याभरात शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाल्याने यंदा भाविकांची संख्या रोडावली होती. तरीदेखील देवीच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत सात लाखांनी वाढ झाली आहे.देशातील ५१ शक्तिपीठे व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षाकाठी ५० ते ६० लाख भाविक येतात. केवळ नवरात्रौत्सवात ही भाविक संख्या २० लाखांच्या घरात जाते. यंदा मात्र महापुराने येथील घरसंसार, पशुधन, शेती, उद्योग-सगळ्याच क्षेत्रांची मोठी हानी झाली. यातून अजूनही कोल्हापूर पूर्णत: सावरलेले नाही. महापुरानंतर १५ दिवसांनी गणेशोत्सव आणि एक महिन्याने नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. मात्र, महापुरानंतर लगेचच कोल्हापुरात येणे परस्थ भाविकांनी टाळले. त्यामुळे १५ लाख ते २० लाखांची भाविक संख्या यावर्षी दहा लाखांवर आली. असे असतानाही देवीच्या खजिन्यात सोन्या-चांदीचे लाखोंचे अलंकार, धार्मिक विधी, विविध पूजा, लाडूप्रसाद विक्री, आदींतून मोठी रक्कम जमा झाली.देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचीही संधीकोल्हापूरला अंबाबाई, जोतिबासारख्या दैवतांचे अधिष्ठान असले तरी या शहराला ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. येथे आलेले भाविक अंबाबाईचे दर्शन घेतले की न्यू पॅलेस, रंकाळा, जोतिबा, पन्हाळा, कणेरी मठ यांसारख्या पर्यटनस्थळांना भेट देऊन जातात. देवदर्शनासोबत पर्यटन होते, मित्र, नातेवाइकांसोबत दोन-तीन दिवस पर्यटनात जातात. पुढे कोकण आणि गोवा असल्याने पुढचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे देवीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.
अंबाबाईला दान वाढता वाढे...सात लाखांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:53 AM