बाजीराव जठार
वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी तब्बल साठ लाख रुपयांचे दातृत्व लाभल्याने या शाळेचे रूपडे अंतर्बाह्य पालटणार आहे. बाळू मामा यांचे मुंबई येथील भक्त ॲड. देवदत्त गंगावले यांच्या या आर्थिक योगदानातून आठ खोल्यांची सुंदर अशी शाळा साकारण्यात येणार आहे.
सध्या गावामध्ये आठ खोल्यांची इमारत बाळू मामांचे कार्यस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरगूबाई मंदिर परिसरात आहे. आदमापूर येथे अत्याधुनिक डिजिटल शाळा उभा करावी, अशी मागणी देवालय समितीकडे ग्रामस्थांनी केली होती. त्यातच देवदत्त गंगावले यांनी स्वखर्चातून हे काम पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला.
गावठाण परिसरात पाण्याच्या टाकी शेजारी ही भव्य-दिव्य वास्तू उभारली जाणार आहे. शिक्षणक्षेत्रातील चांगल्या कामासाठी ॲड. गंगावले हे बाळू मामाचे निस्सीम भक्त जणू देवदूत बनून समोर आले आहेत. चांगली शाळा उभी राहणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गावचा काहीतरी देणे लागतो, यासाठी येथील प्राथमिक शाळेची इमारतीचे बांधकाम करून देणार आहे. येथील मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तयारी आहे. - ॲड. देवदत्त गंगावले, मुंबई.