कोल्हापूर : भाजप सरकार हे खोटे आणि फसवे आहे. या सरकारने बेरोजगारी वाढविली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या, शेतकऱ्यांना ताकद देणाऱ्या काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत बळ द्या. महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीकडे तटस्थ म्हणून पाहू नका. एकत्र या, सतर्क राहून जागृती करा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे तरुणाईला केले.भाजप सरकारविरोधातील ‘महाराष्ट्र एनएसयुआय’ची (नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडिया) बेरोजगार यात्रा बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. त्यानिमित्त काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते. ‘एनएसयुआय’चे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘देशात मंदीबरोबरच बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. ते कमी करण्याला प्राधान्य देण्याऐवजी भाजपचे नेते अन्य मुद्दे उपस्थित करत आहेत. केवळ घोषणा करणाऱ्या भाजप सरकारकडून युवकांच्या भवितव्यासाठी काहीच होणार नाही. रोजगाराच्या संधी वाढविणारे कॉँग्रेसचे सरकार आल्याशिवाय तरुणाईचे भवितव्य सुखकारक होणार नाही.
प्रदेशाध्यक्ष शेख म्हणाले, ‘तरुणाईचा कौल मिळाल्यामुळे भाजप सरकार पाच वर्षांपूर्वी सत्तेत आले; मात्र बेरोजगारी वाढवून या सरकारने तरुणाईचे भवितव्य अंधकारमय केले आहे. नोंदणीकृत ४५ लाख आणि नोंदणी नसलेले सुमारे ५० लाख युवक सध्या बेरोजगार आहेत. भाजप सरकारने नवे रोजगार, नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. त्याबाबत राज्यातील तरुणाईला जागे करण्यासाठी ‘एनएसयुआय’द्वारे बेरोजगार यात्रा काढण्यात येत आहे. बेरोजगारी वाढविणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून बाहेर घालवा. काँग्रेसच्या पाठीशी राहा.’या मेळाव्यात बयाजी शेळके, दुर्वास कदम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवीण केसरकर, राहुल माने, सचिन चव्हाण, दिग्विजय मगदूम, दीपक थोरात, इंद्रजित बोंद्रे, नितीन बागी, सनी सावंत, आदी उपस्थित होते. एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक मिठारी यांनी सूत्रसंचालन केले. सुजय चव्हाण यांनी आभार मानले.नरेंद्र, देवेंद्र बेरोजगारीचे केंद्रमेळाव्यानंतर काँग्रेस कमिटी ते सीबीएस स्टँड परिसरातील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत ‘एनएसयुआय’तर्फे पायी रॅली काढण्यात आली. त्याद्वारे बेरोजगार यात्रेला कोल्हापुरातून निरोप देण्यात आला. ‘नरेंद्र, देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘रोजगार आमच्या हक्काचा’ अशा घोषणा देत कार्यकर्ते, युवक-युवती या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.