यांचे आवाहन
आजरा
: आजरा शहरासह परिसरातील रंगपंचमी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवार, दि.१२ एप्रिल रोजी साजरी होणार होती; परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रस्ता, चौक, पटांगण, महामार्ग अशा ठिकाणी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करता येणार नाही. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असल्याने रंगपंचमी उत्सव एकत्र येऊन खेळताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पत्रक आजरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
आजरा शहर व शेजारील गावांमध्ये गुढीपाडवा सणाच्या अगोदरच्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची २०० ते २५० वर्षांची परंपरा आहे; पण सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रासह देशात झपाट्याने वाढून जनजीवन विस्कळीत होत आहे. शासनाने सध्या मिनी लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू केले आहेत. कोणतेही सण, उत्सव, यात्रा, आंदोलने तसेच लोक एकत्र येऊ नयेत, अशी नियमावली जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने सोमवार, १२ एप्रिल रोजी होणारी रंगपंचमी साजरी करता येणार नाही. नागरिकांनी स्वतःच्या घरी राहून रंगपंचमी हा उत्सव साजरा करावा, असेही आवाहन सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले आहे.