Kolhapur: पक्षांतर नकोच, भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा; ‘पी. एन. पाटील’ गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:26 IST2025-03-25T12:26:14+5:302025-03-25T12:26:37+5:30
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापुरात येत असून त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच दिवंगत आमदार पी. एन. ...

Kolhapur: पक्षांतर नकोच, भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा; ‘पी. एन. पाटील’ गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापुरात येत असून त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच दिवंगत आमदार पी. एन. पाटील गटाची पुढची राजकीय दिशा स्पष्ट करूया, असा निर्णय सोमवारी श्रीपतरावदादा बँकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. भोगावती साखर कारखान्यासाठी पक्षांतर करू नका, अशी उघड भूमिका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने पाटील गटासमोर पेच निर्माण झाला आहे. बैठकीला राहुल व राजेश पाटील दोघेही उपस्थित नव्हते.
परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कारखान्याला मदत हवी असेल तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी महायुतीसोबत यावे, असा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोघांना पक्षात येण्याची ऑफर दिली. तर, भाजपमधूनही विचारणा होऊ लागल्याने ‘करवीर’ मतदारसंघात गेल्या आठ-दहा दिवसापासून राहुल पाटील यांच्या पक्षांतराची जाेरदार चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, ‘भोगावती’ साखर कारखाना टिकला पाहिजे, सध्या कारखान्यासमोर अडचणींचा डोंगर आहे. कारखाना कार्यक्षेत्रात विधानसभेला ७२ हजार मते आहेत. शासनाकडून अनुदान मिळाले नाहीतर अडचणी वाढणार आहेत.
यावर, कारखाना अडचणीत आहे म्हणून पक्षांतर करायचे का? अशी विचारणा विश्वनाथ पाटील, बी. एच. पाटील यांनी केली. प्राचार्य आर. के. शानेदिवाण म्हणाले, आमदार सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत ‘भोगावती’ची अडचण सांगितली आहे. गडबडीने निर्णय घेऊ नका, गुरुवारी कोल्हापुरात येत आहे. आपण व राजेश पाटील जिल्हा बँकेचे संचालक आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून कारखान्याला मदत देण्याबाबत सांगूया, असे त्यांनी सांगितले.
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसमध्ये काम करुया, पण ‘राहुल’ व ‘राजेश’ यांनी मतदारसंघात फिरले पाहिजे, अशी महत्त्वाची सूचना बी. एच. पाटील यांनी केली.
यावर, सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर पुढील दिशा ठरवूया, असा निर्णय झाला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे, ए. डी. पाटील, पी. डी. धुंदरे आदी उपस्थित होते.
भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा
काँग्रेसच्या पडत्या काळात पक्षाला सोडून जाणे उचित नाही. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा, असेही काहींनी निदर्शनास आणून दिले.