कोल्हापूर : गृहखात्याच्या कारभारावरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेना उधान आले आहे. दरम्यानच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा झाली. यामुळे या चर्चेना उकळी फुटली.
मात्र, या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन करत अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करत असल्याचे स्पष्ट केले. यासर्व घडामोडीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.
या नाराजीनाट्याच्या सर्व घडामोडीवर मुख्यमंत्र्यांना काय सल्ला द्याल याबाबत प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, सल्ला देण्याची वेळ निघून गेली. जसा मी सल्ला दिला होता, राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देवू नका. पण त्यांनी एेकले नाही. मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की दुसरा पक्ष खाण्यामध्ये मास्टर आहेत आणि तो खालं की बाजूला फेकतात असा ज्यांचा इतिहास आहे. पण हे सल्ले एेकण्याच्या मनस्थितीत उद्धवजी आजही आहेत असे मला वाटत नाही असेही ते म्हणाले.
करुणा मुंडे यांना न्याय द्या
दरम्यान, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे सांगत, महिलांबाबत इतकी आत्मीयता आहे तर महाडिक यांच्या नावाने टाहो फोडण्यापेक्षा करुणा मुंडे यांना न्याय द्यावा असा टोला लगावत महाडिक यांची पाठराखण केली.