कोल्हापूर : वडाची झाडे रस्त्याच्या कडेला आणि धार्मिक स्थळांभोवती पहायला मिळतात. वडाचे एक झाड साडेचार हजार जणांना ऑक्सिजन पुरवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून आपण ती झाडे तोडून त्याची पूजा करण्यापेक्षा ती झाडे जगवून वटपौर्णिमा साजरी करा, असे आवाहन पर्यावरण अभ्यासक आणि सर्प व वृक्षमित्र दिनकर चौगुले यांनी केले. वटपौर्णिमेसह आपले सगळे भारतीय सण नेहमीच पर्यावरणपूरक आहेत, त्यामागे स्त्रियांचे आरोग्य जपले जाते, त्याची जाण स्त्रियांनीच ठेवली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.उन्हाळ्याचा आणि पावसाळ्याचा मधला दिवस म्हणजे वटपौर्णिमा. यानंतर पावसाला सुरुवात होते, हा निसर्गनियम आहे. यादिवशी अतिरिक्त जमिनीत मुरलेले पाणी जास्त प्रमाणात वड बाहेर टाकते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे ते पाणी वडाच्या झाडाखाली तासभर थांबलेल्या स्त्रियांच्या अंगात मुरते आणि त्या संपूर्ण पावसाळाभर आजारी पडत नाहीत, असे शास्त्रीय कारण या वड पूजण्यामागे आहे. त्यामागे एक दृष्टी होती. खरं कारण कोणी ऐकत नाही म्हणून देवाच्या नावावर वड पूजा केली जात होती.वनखात्याने कधीच वडाची झाडे लावल्याचे रेकॉर्ड नाही. त्यामुळे ही वडाची झाडे जपण्याची जबाबदारी स्त्रियांवर आलेली आहे. वडाऐवजी आपण निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, केशिया लावून भारतीय संस्कृती नष्ट करत आहोत. ज्याला जपायचे ते आपण जपत नाही, मग वडाच्या झाडे तोडून आपण त्याची पूजा का करायची यावर स्त्रीयांनी विचार केला पाहिजे, असा सवालही त्यांनी केला.रोपे कुंडीत वाढवा, पण वड जगवावडाच्या कुंडीभोवती फिरून मुली वटपौर्णिमा साजरा करतात. अलीकडे तर वडाच्या फांद्याच तोडून आणून घराघरात, सोसायटीत, अपार्टमेंटमध्ये वटपौर्णिमा साजरी केली जाते. हे चुकीचे आहे. वडाच्या सानिध्यात स्त्रियांनी राहण्यामागचे शास्त्रीय कारण समजून घ्या, वडाची रोपे विकत घ्या, त्यापुढे वटपौर्णिमापण साजरी करा आणि ती झाडे जगवा. कुंडीत रोपे वाढू लागली तर एक फोन करा, आम्ही ती झाडे घेऊन जाऊ, असे आवाहन चौगुले यांनी केले आहे.
केवळ पूजा नको, संवर्धन करा; वडाचे एक झाड साडेचार हजारजणांना पुरवते ऑक्सिजन
By संदीप आडनाईक | Published: June 21, 2024 5:03 PM