लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : समरजित घाटगे आपण जरूर राजे आहात, त्यामुळेच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात. मी एक सामान्य कुटुंबात जन्मलो म्हणून माझा अपमान करून स्वाभिमान डिवचू नका, अस पलटवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समरजित घाटगे यांनी बुधवारी दसरा चौकात उपोषण केले होते. त्यावेळी, ए. वाय. पाटील यांचा बोलवता धनी वेगळा असल्याची टीका घाटगे यांनी केली होती. यावर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पत्रकाद्वारे पलटवार केला.
समरजित घाटगे, तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष आहात व मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे. दोन्ही पक्षांच्या विचारधारामध्ये अंतर आहे. मी तुमच्यावर राजकीय टीका केली होती. मी कोणतीही व्यक्तिगत टीका केली नाही, तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्या वेळी, तुम्ही टीका केली. तुमची भाषा ही कागलची आहे, कागलमधून स्क्रिप्ट येते आणि तुम्ही ते प्रसारमाध्यमांना देता, अशी टीका करता, हे योग्य नाही. मी राजकीय परंपरा नसलेल्या कुटुंबातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आलो. पंचवीस ते तीस वर्षे प्रामाणिकपणे निष्ठेने पक्षाचे काम करीत आहे. अतिशय विनयाने राधानगरी तालुक्यामध्ये तुमच्या कागल तालुक्यामध्ये तुम्ही आणलेल्या ग्रामपंचायतींपेक्षा कितीतरी ज्यादा ग्रामपंचायती मी पक्ष संघटनेच्या ताकतीवर विजयी केल्या आहेत. अनेक वर्षे पंचायत समितीवर वर्चस्व ठेवले आहे. जिल्हा परिषदेमध्ये विजय मिळविला, बँकेवर अनेक वर्ष संचालक आहे, असे असताना मी अडाणी आहे, असे मला समजता. अशी विधाने करणे योग्य नाही.
केंद्र सरकारकडून जीएसटीच्या परताव्यापोटी महाराष्ट्र राज्य सरकारला अडतीस हजार कोटी येणार आहेत. नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी शासन करणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.