कोल्हापूर : राज्यपालांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन देऊन मराठा समाजाला उल्लू बनवू नका, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी रात्री केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्याची विनंती केली. त्यावर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘पंढरपूरला जायचे असताना गोव्याच्या गाडीत कशाला बसायचे?’ असा टोमणाही त्यांनी मारला आहे.
पाटील म्हणाले, मराठा समाजाची दिशाभूल करणारी अशी ही भेट आहे. अजूनही महाविकास आघाडी सरकारने मागास आयोगाची स्थापना केलेली नाही. ती करावी लागेल. पुन्हा मराठा समाजाला मागास ठरवावे लागेल. ते केंद्र सरकारकडे पाठवावे लागेल. यांतील काहीही न करता ज्या राज्यपालांना गेले आठ महिने शिव्या दिल्या, त्यांनाच नम्रपणे हे निवेदन देणे हास्यास्पद आहे. मराठा आरक्षणाचा कायदा राज्य सरकारलाच करावा लागेल.