कोल्हापूर : लाईन बाजार येथील झूम प्रकल्पातील कचºयातील धुरामुळे १0 हजार नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे; त्यामुळे नुसत्या नोटीसचे गुºहाळ नको, महापालिकेच्या आयुक्तांवर तत्काळ फौजदारी करा, अशी मागणी मंगळवारी कॉमन मॅन संघटनेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली.
गेल्या तीन वर्षांपासून परिसरात कचºयाचा धूर आरोग्याला घातक ठरत असताना एकदाही येथून बाहेर पडणाºया वायूची तपासणी का केली नाही, असा सवाल करत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना खडेबोल सुनावले.
कॉमन मॅन संघटनेचे अॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘झूम येथील धुरातून शरीरास हानीकारक विषारी वायू बाहेर पडत आहे. लाईन बाजार परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती आहे. या दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने झूम परिसरातील वायूची तपासणी का केली नाही. याचबरोबर या परिसरात कोणता वायू बाहेर पडतो, त्याचे प्रमाण किती आहे, या वायूपासून कोणता त्रास होऊ शकतो, या माहितीचा फलक परिसरात का लावण्यात आला नाही. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे गायकवाड, महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे यांना खडेबोल सुनावले.
- नोटीस काढून कोणाला फसविता
वर्षभरात येथील प्रदूषण कमी होण्यासाठी काय उपाययोजना केल्या, असा सवाल अॅड. इंदुलकर यांनी केला. यावर प्रशांत गायकवाड यांनी झूम परिसरात पाहणी केली असून, सोमवारी महापालिकेला नोटीस बजावल्याचे सांगताच अॅड. इंदुलकर भडकले. ते म्हणाले, केवळ नोटीस काढून कोणाला फसविता. येथील समस्यांवर नोटीस हे उत्तर नाही; त्यामुळे नोटीसचे गुºहाळ थांबवा, थेट आयुक्तांवर गुन्हा दाखल करा.
- तर झूम परिसरात कार्यालय
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशासन सुस्त आहे. केवळ नोटीस काढण्याचे काम करत आहे; त्यामुळे तत्काळ कारवाई केली नाही, तर झूम येथील कच-याच्या ढिगामध्येच कार्यालय सुरू करण्यास भाग पाडू, असा इशाराही देण्यात आला. तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहा म्हणजे नागरिकांना काय त्रास होतो, ते समजेल. ‘एसी’मध्ये बसून नागरिकांच्या व्यथा समजणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.