गडहिंग्लज :
गडहिंग्लजच्या औद्योगीकरणाला खीळ घातलेल्या ग्रेमॅक कंपनीला गडहिंग्लज एमआयडीसीत अजिबात जागा देऊ नये. पुन्हा त्या कंपनीला जागा दिल्यास स्थानिक उद्योजकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे स्थानिक छोट्या-मोठ्या उद्योजकांना भूखंड वितरणाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे आज (सोमवारी) केली.
२००७ मध्ये तब्बल २५० एकर जागा मिळूनदेखील १० वर्षांत 'ग्रेमॅक'ने कोणताही उद्योग उभारला नाही. त्यामुळेच गडहिंग्लजच्या औद्योगीकरणाला खीळ बसली. तरीदेखील त्याच कंपनीला पुन्हा १०० एकर जागा देण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे स्थानिक उद्योजक व जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याला 'लोकमत'ने सोमवारच्या (५) अंकात 'गडहिंग्लज एमआयडीसीची जागा पुन्हा ग्रेमॅकच्या घशात' या मथळ्याखालील वृत्ताद्वारे वाचा फोडली. त्यामुळे शिवसेना व भाजपानेही 'ग्रेमॅक'ला जागा देण्यास तीव्र विरोध केला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले, तर भाजपाचे गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनीही 'ई-मेलद्वारे' उद्योगमंत्र्यांना साकडे घातले.
शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे की, विहित मुदतीत प्रकल्प न उभारल्यामुळेच शासनाने 'ग्रेमॅक'कडून जागा काढून घेतली. त्याठिकाणी पाडण्यात आलेले भूखंड स्थानिक उद्योजकांना वितरित केले जात असल्यामुळे औद्योगीकरणाला चालना मिळत आहे; परंतु ग्रेमॅकला पुन्हा जागा दिल्यास लहान व मध्यम उद्योजकांवर अन्याय होणार आहे.
भाजपाच्या निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लजचा औद्योगिक विकास खुंटण्यास 'ग्रेमॅक'च कारणीभूत आहे.
तरीदेखील पुन्हा मोठ्या प्रमाणात जागेची मागणी करून कंपनीने नवा खेळ मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.
ग्रेमॅक कंपनीबद्दल जनतेत प्रचंड असंतोष असल्यामुळे 'ग्रेमॅक'ला अजिबात जागा देऊ नये, त्याऐवजी ती जागा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना वाटप करावी. त्यातूनच गडहिंग्लज विभागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
फोटो ओळी : कोल्हापूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी एमआयडीसीचे प्राधिकृत अधिकारी धनंजय इंगळे यांना निवेदन दिले.
क्रमांक : ०५०७२०२१-गड-१५