निपाणी : निपाणी शहरात असलेले ऐतिहासिक म्युनिसिपल हायस्कूल हस्तांतरित करण्याबाबत ठराव नगरपालिकेत सत्ताधारी गटाने मंजूर केला आहे. असे असले तरी हा ठराव मंजूर झाल्यानंतर याला निपाणी शहरातील सर्व स्तरांतून विरोध होताना दिसत आहे. सोशल मीडियात अनेकांनी याबाबत विरोध दर्शवला असून, निपाणी शहराची ऐतिहासिक वास्तू असल्याने तिचे हस्तांतरण होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. त्यातच विरोधी गटाच्या नगरसेवकांनी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. यामुळे म्युनिसिपलचे हस्तांतरण हा विषय सध्या चर्चेत आहे.
निपाणी शहरातील म्युनिसिपल हायस्कूलची वास्तू ही ऐतिहासिक वास्तू गणली जाते. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह दिग्गज मंडळींनी या ठिकाणी भेट दिली आहे. त्याचबरोबर या शाळेत शिकलेले असंख्य विद्यार्थी आज उच्च पदांवर काम करीत आहेत. त्यामुळे हा विषय माजी विद्यार्थी व निपाणीकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपली प्रगती साधली आहे. एकूण १७ एकर जागेवर हे हायस्कूल उभे आहे; पण हस्तांतरणाच्या विषयामुळे यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.
हायस्कूल स्थापना झाली त्यावेळी पाचवी ते दहावी असे वर्ग भरत होते; पण दोन हजार बारा साली पाचवी ते सातवी वर्ग बंद झाले. सध्या आठवी ते दहावी असे वर्ग सुरू आहेत. १४७ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
क्रांतिदिनी होणार आंदोलनाला प्रारंभ
शतकोत्तर परंपरा असलेल्या म्युनिसिपल हायस्कूलचे सरकारकडे हस्तांतरण करण्याचा घाट पालिका पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. याला विरोध म्हणून सर्वपक्षीय बैठक करून क्रांतिदिनापासून आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, माजी आमदार काकासाहेब पाटील, उत्तम पाटील व नगरसेवक विलास गाडीवर यांनी दिली.