समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रेरणा देण्यासाठी पाठविलेल्या अमोल आचरेकर याने कोरोना ही साथ नाही, मास्क वापरण्याची गरज नाही, घरातून बाहेर पडा, घरातच बसू नका अशी मुक्ताफळे उधळली आहेत.
करवीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे मार्गदर्शन सुरू असून गेले सहा महिने रात्रीचा दिवस करून अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कामावर पाणी फिरविण्याचे काम या व्यक्तीकडून सुरू आहे.तोंडी तक्रार करूनही या प्रशिक्षकाचे प्रशिक्षण बंद केले नसल्याने करवीर तालुक्यातील डॉक्टर्सनी सोमवारी डॉ. योगेश साळे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. वडणगे, भुये, कणेरी, इस्पुर्ली, उचगाव, हसूर आणि मुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.आचरेकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन आपण कोरोनाच्या काळामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जावून प्रेरणादायी विचार मांडतो म्हणून परवानगी मिळविली. चांगले मानसिक समुपदेशन होईल यासाठी देसाई यांनीही त्यांना यासाठी परवानगी दिली आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली.
आचरेकर पथक घेऊन ३० सप्टेंबरला मुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी डॉ. रिझवाना मुल्ला यांना अपमानास्पद वागणूक दिली. मी जागेवर तुम्हाला निलंबित करू शकतो. अशी दमबाजी केली. डॉ. मुल्ला यांचा त्यांनी लोकांसमोरच तीन ते चारवेळा शट अप म्हणून अपमान केला.
डॉ. मुल्ला यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडे तक्रार केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना हा प्रकार समजल्यानंतर आचरेकर याने मित्तल यांची माफी मागितली.ड्रायफ्रूटस कुठे आहेत?जेथे जातील तिथे ही व्यक्ती ड्रायफूट, जेवणाची व्यवस्था केली आहे का, अशी पहिली विचारणा करते. वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यावर त्यांनी ड्रायफ्रूटची विचारणा केली. ड्रायफ्रूट मिळत नाहीत म्हटल्यावर ज्यूसची मागणी केली.