कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी आहेत. याची दखल घेत प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांना चांगलेच फैलावर घेतले. ‘ऑफिसमध्ये बसून काम करू नका, प्रत्यक्ष भागात फिरून यादी तपासा,’ अशा शब्दांत त्यांना सुनावले.
उपशहर अभियंता चव्हाण मतदार यादीच्या कार्यक्रमाकडे गांभीर्याने पाहत नसून कामांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत, हरकती घेणाऱ्या नागरिकांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागवत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी एखाद्या कार्यक्षम व्यक्तीस नियुक्त करावे, अशी मागणी माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी बलकवडे यांच्याकडे केली.
प्रारूप मतदार याद्यांवर हरकत घेण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. दोन दिवसांत शिवाजी मार्केट कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होत होत्या. अजित ठाणेकर यांनी महालक्ष्मी मंदिर प्रभागात २०१५च्या निवडणुकीत अंतिम यादीत असलेली सुमारे १०४६ नावे नव्या प्रारूप यादीत नसल्याची हरकत दाखल केली होती. तसेच अन्य प्रभागातून सुमारे १०३६ नावे या प्रभागात समाविष्ट केल्याची हरकतही घेतली होती. हरकती स्वीकारताना उपशहर अभियंता चव्हाण वेगवेगळी कारणे सांगून चालढकल करत होते. अनेक नागरिक हरकत दाखल करू शकले नाहीत. यावर ठाणेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला.
त्यावेळी त्यांच्या हरकती दाखल करून घेण्यात आल्या; परंतु प्रारूप यादीतून वगळलेल्या नावांच्या हरकतींसोबत २०१५ ची अंतिम यादी लावल्याच्या कारणावरून मंगळवारी एका दिवसात ही हरकत निकाली काढण्यात आल्याचे पत्र ठाणेकरांना देण्यात आले. जी नावे नव्या यादीत नाहीत ती नावे जुन्या यादीतच पाहावी लागतील, हे सांगण्यासाठी अजित ठाणेकर विभागीय कार्यालयात गेले असता तेथे उपशहर अभियंता उपस्थित नव्हते. त्यांनी प्रशासक बलकवडे यांच्याकडे तक्रार केली.
नंतर विभागीय कार्यालयात जाऊन बलकवडे यांनी सर्व गोष्टींची माहिती घेतली. यावेळी ठाणेकरांनी त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली व उपशहर अभियंता अकार्यक्षमपणे काम करत असल्यामुळे निवडणुकीच्या काळात या पदावर त्यांना ठेवू नये, अशी मागणी केली. प्रशासकांनी चव्हाण यांना ‘ऑफिसमध्ये बसून काम करू नका, प्रत्यक्ष भागात फिरून यादी तपासा,’ असे सुनावले. ठाणेकरांच्या हरकतींची पूर्ण शहानिशा करण्याचे आदेश दिले.