कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत असून, हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी केले. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, म्हणजे बियाणे वाया जाण्याचा धोका उद्भवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ उपस्थित होते.
कृषी मंत्री भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून, गरज भासल्यास बफर स्टॉकमधून खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा, शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, जेणेकरून दुबार पेरणी करावी लागणार नाही. कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ तांदूळ, सांगलीचे बेदाणे (मनुके) व हळद उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी, चंदगड भागातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावपातळीवर शेतकऱ्यांशी संवाद, त्यांचे योग्य पद्धतीने पोषण व्हावे, यासाठी किट देण्यात येणार आहे, असे सांगून आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून किट घ्यावे व जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वितरित करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी नावीन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.