लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आयजीएम व क्रीडा संकुल यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे योगदान आहे. त्यासंदर्भातील सर्व पत्रव्यवहारही उपलब्ध आहेत. असे असताना काहीही न करता दुसऱ्याने केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत करण्यात आला. यापुढे असा श्रेयवाद खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शहापूर येथे प्रस्तावित असलेल्या क्रीडा संकुलाबाबत पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासोबत पाहणी करण्यासाठी जाऊन हे काम मीच केले, असे आमदार आवाडे यांनी दाखविले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आयजीएम रुग्णालयासाठी १८ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटप केली; परंतु प्रत्यक्षात या कामांसाठी महाविकास आघाडीने निधी उपलब्ध केला आहे. तसेच खासदार धैर्यशील माने यांनी त्याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यांच्या नावाने आलेले सप्टेंबरपासूनचे पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. असे असताना फुकटचे श्रेय आवाडे घेत असल्याचा आरोप नगरसेवक रवींद्र माने, राहुल खंजिरे, सयाजी चव्हाण, महादेव गौड, शशांक बावचकर, भाऊसाहेब आवळे यांनी पत्रकार बैठकीत केला.