कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकदा नव्हे तर दोनवेळा सुरतेवर स्वारी करून ती लुटली आहे. त्यामुळे राजकारण्यांनी इतिहास वाचावा, तो खोटा सांगू नये, या शब्दांत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सुरत लुटीवर भाष्य करणाऱ्यांना मंगळवारी सत्ताधाऱ्यांना चांगलेच खडसावले.कोल्हापुरातील सायबर कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. पवार म्हणाले, मोगलांमुळे आम्हाला पदरी फौजा बाळगाव्या लागतात. त्यामुळे या फौजेच्या देखभालीसाठी शिवाजी महाराज यांनी १६६४ व १६७० अशी दोनवेळा सुरतेवर स्वारी करून १०० कोटी हाेन आणले. त्याच पैशांतून त्यांनी सिंधुदुर्गसारखे किल्ले उभारले. छत्रपतींनी एकूण १११ किल्ले उभारले. सुरत लुटीतून आणलेल्या सर्व पैशांचा त्यांनी विनियोग केल्याकडे डॉ. पवार यांनी लक्ष वेधले. डॉ.पवार म्हणाले, सध्या राजकारण्यांकडून खोटा इतिहास सांगितला जात आहे. त्यांनी तो अभ्यासावा, मात्र, खोटे काही सांगू नये.
आधी सांगून पाहिलेमुळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटण्याआधी तेथील व्यापाऱ्यांना आमच्या फौजेचे खर्च देण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्या दुतांनी छत्रपतींवरच हल्ला केला. त्यानंतरच महाराज यांनी सुरत लुटली. ही लुटताना त्यांनी आपली नीतीमत्ता सोडली नाही. मोहनदास पारेख नावाच्या व्यापाऱ्याचे निधन झाल्याने त्याचा वाडा जाळायचा नाही, लुटायचा नाही, अशी सक्त ताकीद महाराजांनी मावळ्यांना दिली होती, अशी आठवणही डॉ.पवार यांनी सांगितली.
सूरत लुटली की..या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरत लुटली की नेमके काय झाले? असा सवाल आपल्या भाषणात उपस्थित केला होता. पाटील यांच्या याच भाषणाचा धागा पकडत डॉ. जयसिंगराव पवार यांनी दुसऱ्यांदा भाषणाला उभा राहत सुरत लुटीचा पटच सभागृहासमोर उलगडला.