कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरातील विविध भागात ॲन्टिजेन चाचण्या केल्या जात असून, बुधवारी राजेंद्र नगर परिसरात पथक गेल्यानंतर तेथील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करुन घेतले. तेथे २४ नागरिकांच्या चाचण्या केल्या असता, त्यात चौघेजण कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांची भीतीने गाळण उडाली. राजेंद्र नगर येथे चार तर ताराबाई रोडवर पाच रुग्ण बाधित असल्याचे आढळले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिक जेथे गर्दी करतात, त्याठिकाणी अचानक जाऊन कोरोनाची ॲन्टिजेन चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यातून अनेक व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत आहे. कोराना झाल्याचे त्यांना माहीतच नसल्याने या व्यक्ती समाजात उघडपणे फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढत असून, तो रोखण्यात या चाचण्या उपयोगी पडत आहेत.
बुधवारी सकाळच्या सत्रात ताराबाई रोडवरील सरस्वती चित्रमंदिरसमोर महापालिका पथकाने ५३ नागरिकांच्या ॲन्टिजेन चाचण्या केल्या. त्यामध्ये पाच नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. या पाचमध्ये दोन भाजी विक्रेते आहेत तर तिघे एकाच घरातील आहेत.
दुपारच्या सत्रात राजेंद्र नगरात हे पथक गेले. त्याठिकाणी पहिल्या चार व्यक्तींची तपासणी केली, त्यापैकी तीन व्यक्ती या कोरोनाबाधित असल्याचे दिसून येताच परिसरातील नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद करुन घेतले. यावेळी पथकातील डॉ. कुंभार व विभागीय आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी नागरिकांना बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, कोणीही बाहेर यायला तयार होईनात. त्यामुळे कशाबशा २४ जणांच्या चाचण्या केल्यानंतर ही मोहीम थांबविण्यात आली.