कोल्हापूर : बारावीपाठोपाठ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (दहावी) देखील कोल्हापूर विभागात ९४.४५ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल ठरत यशाचा ‘डबल बार’ उडविला आहे. कोल्हापूर विभागाचा दहावीचा एकत्रित निकाल ९३.८३ टक्के लागला. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.४७ टक्क्यांनी वाढ झाली असून, राज्यात या विभागाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज, मंगळवारी दुपारी एक वाजता ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ या तत्त्वानुसार ‘आॅनलाईन’ निकाल जाहीर झाला. त्यानंतर पत्रकार परिषदेत कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव शरद गोसावी यांनी विभागातील निकालाची माहिती दिली. कोल्हापूर विभागांतर्गत २ हजार ११९ शाळांमधील एकूण १ लाख ४२ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४२ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी मार्च २०१४ मध्ये ३४३ केंद्रांवरून परीक्षा दिली. त्यातील १ लाख ३३ हजार ६९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ७३ हजार ७३९ मुले, तर ५९ हजार ९५३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा २.८५ टक्क्यांनी जास्त आहे. कोल्हापूर विभागाचा एकत्रित निकाल ९३.८३ टक्के लागला. त्यात कोल्हापूर जिल्हा ९४.४५ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. सातारा ९३.६० टक्क्यांसह दुसऱ्या, तर सांगली ९३.१८ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे. यंदाच्या परीक्षेदरम्यान ६७ गैरमार्गांची प्रकरणे झाली. त्यातील ६२ जणांवर कारवाई झाली. विभागात प्रमुख विषयांत समाजशास्त्र विषयाने ९८.२२ टक्क्यांनी पहिले स्थान पटकाविले आहे. विद्यार्थ्यांना दि. २६ जूनला दुपारी तीन वाजता शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतल्यामुळेच कोल्हापूर विभाग आणि जिल्ह्याचा यंदा चांगला निकाल लागला असल्याचे सचिव गोसावी यांनी सांगितले. ते म्हणाले, यावर्षीच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळले, अशा संवेदनशील केंद्रांवर पुढील वर्षी परीक्षेवेळी ‘सीसीटीव्ही’ची नजर राहणार आहे. त्याबाबत संबंधित शाळांना सूचना दिल्या जातील. गणिताचा पेपर १५० पैकी १०० गुणांचा केल्यामुळे या विषयाच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे. (प्रतिनिधी)
विभागात ‘कोल्हापूर’चा डबल बार; राज्यात दुसऱ्या स्थानी
By admin | Published: June 18, 2014 12:47 AM