सांगली : किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धेत मुलींमध्ये आणि मुलांमध्येही मुंबई उपनगरनेच संयुक्त विजेतेपद मिळवून ‘डबलबार’ उडविला. मुलांचा अंतिम सामना सांगली विरूध्द मुंबई उपनगर यांच्यात झाला. अत्यंत अटीतटीचा हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या सामन्याच्या मध्यंतरास मुंबई उपनगरकडे ७-३ अशी आघाडी होती. मात्र, हा सामना निर्धारित वेळेत १०-१० अशा समान गुणांवर संपला. दरम्यानच्या काळात पावसाचा जोर वाढल्याने सामना मैदानावर खेळवता येत नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह संभाजी पाटील, स्पर्धा निरीक्षक उत्तम माने, तरुण भारत मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सगरे, उपाध्यक्ष महेश पाटील व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन शिंदे यांनी निर्णय घेऊन स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. विजेतेपदाच्या चषकासाठी नाणेफेक घेण्यात आली. नाणेफेक मुंबई उपनगर संघाने जिंकल्याने पहिले सहा महिने चषक मुंबई उपनगरकडे व पुढील सहा महिने चषक सांगलीकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगलीच्या सचिन पवार व अनिकेत तिवरे यांनी उत्कृष्ट खेळ केला. उपनगरच्या भरत करगुटकर व सिध्देश पांचाळ यांनी वेगवान चढाया केल्या. मुलींचा अंतिम सामना मुंबई उपनगर विरूध्द अहमदनगर यांच्यात पार पडला. यामध्ये मुंबई उपनगरने १९-६ अशा गुणफरकाने अंतिम विजेतेपद आपल्या नावे केले. मध्यंतरास उपनगर संघाकडे १२-१ अशी आघाडी होती. उपनगरच्या कोमल यादव व सृष्टी रासमने हलक्या पावसातही उत्तम खेळ करून आपल्या संघाकडे विजयश्री खेचून आणली.
मुंबई उपनगरचा ‘डबलबार’
By admin | Published: October 05, 2015 1:01 AM