लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘भाडेवाढ करावी तर प्रवासी पाठ फिरवणार’, ‘वाढ केली नाही तर रोजच्या उत्पन्नावर परिणाम’, असे दुहेरी संकट कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिकांसमोर आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना शासनाकडूनच थेट मदत मिळावी, अशी मागणीही जोर धरत आहे. मुंबईतील रिक्षा व्यावसायिकांना तीन रुपयांच्या भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातही रिक्षा व्यावसायिकांचा भाडेवाढीचा विषय चर्चेत आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. याचा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत आहे. दरम्यान, कोरोनात लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय करता आला नाही. त्यांचे बँकेतील कर्जाचे हप्ते थकले असून फायनान्स कंपनीकडून वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. रिक्षा संघटनाकडून शासनाकडे आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कोणताही निर्णय घेतलेला नाही. या सर्वांचा विचार करून मुंबईतील रिक्षा व्यावसायिकांना तीन रुपये भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे. कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, दरवाढीबाबत फारसे कोणी उत्सुक दिसत नाही.
प्रतिक्रिया
भाडेवाढ मिळेल पण प्रवाशांचाही विचार करावा लागेल. अगोदरच कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात आहेत. प्रवासीच आले नाही तर भाडेवाढ काय उपयोगाची आहे. यावर पर्याय म्हणजे रिक्षा व्यावसायिकाचा खर्च कमी करणे गरजेचा आहे. सीएनजीवर रिक्षा केल्यास खर्च कमी होणार आहे. यासाठी शासनाने सीएनजी पंप कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू करावेत.
सुभाष शेटे, अध्यक्ष, करवीर ॲटो रिक्षा युनियन
प्रतिक्रिया
वाढलेली महागाई, खर्च विचार करता भाडेवाढ करणे गरजेचे असले तरी व्यवहार्य नाही. रिक्षा व्यावसायिकांची स्थिती बिकट असली तरी कोरोनामुळे नागरिकही अडचणीत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या हितासाठी भाडेवाढ करणे सध्या तरी योग्य वाटत नाही.
मोहन बागडी, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा व्यावसायिक संघटना
प्रतिक्रिया
कोरोनामुळे अगोदरच प्रवासी संख्या कमी झाली असून रोज १५० रुपयांवर व्यवसाय होताना अडचणी येत आहेत. अशा स्थितीत भाडेवाढीमुळे फायद्यापेक्षा तोटाच होणार आहे. अडचणीत असलेल्या रिक्षा व्यावसायिकाला उभारी देण्यासाठी भाडेवाढ नको, तर शासनाने थेट अनुदान स्वरूपात मदत करावी.
राजू जाधव, जिल्हाप्रमुख महाराष्ट्र रिक्षाचालक सेना