लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पराभवाने वीरेंद्र मंडलिक यांची नाराजी ठीक आहे. त्याचे निरसन केले आहे. राजकारणात पराभवानंतर सख्ख्या भावावरही संशय घेतला जातो, असे उत्तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्या नाराजीवर शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर कागल तालुक्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यात गुरुवारी वीरेंद्र मंडलिक यांनी ‘माझा पराभव झाला नाही, तर तो केला गेला’ अशी फेसबुक पोस्ट टाकून उघड नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता, शुक्रवारी सकाळी पराभूत चौघांच्या घरी जाऊन आपण आलेलो आहे. चार उमेदवार पराभूत झाले. त्याची कारणमीमांसाही तपासू, असे त्यांनी सांगितले.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पराभवामुळे वीरेंद्र मंडलिक नाराज आहेत ठीक आहे, ते एकटेच पराभूत झाले नाहीत. इतरही तिघे आहेत. क्रॉस व्होटिंगचा फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे. पराभवानंतर सख्ख्या भावावरही संशय व्यक्त केला जातो. मागील निवडणुकीतही विरोधी आघाडीतील दोघे विजयी झाले होते, असे स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
शपथा घेतल्या तरी क्रॉस व्होटिंग
नेत्यांसह ठरावधारकांच्या शपथा घेतल्या तरी क्रॉस व्होटिंग झाले. दुर्दैवाने शंभर-दीडशे मतांचा फरक पडला, क्रॉस व्होटिंग दरवेळी होते, यावेळी शपथा घेतल्या तरी ते थांबले नाही. यामध्ये गरीब कार्यकर्त्याचा बळी जातो. ‘मोडस ऑपरेंडी’ ही बदलावी लागेल. संचालकांनी चांगले काम करून आताच्या मताधिक्यात हजार, दीड हजार जादा मते घेण्याचा प्रयत्न करा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.