कोल्हापूर : रोज ०.४ ते १ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेणाऱ्या डॉक्सी क्वॉइन कंपनीने केलेल्या फसवणुकीची व्याप्ती वाढली आहे. दहा गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारींनुसार फसवणुकीची रक्कम ७४ लाखांवर गेली आहे. दोनशेहून जास्त लोकांनी या कंपनीत पैसे गुंतविल्याचा अंदाज असल्याने फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जाईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.युरोपसह अमेरिका आणि नायजेरियामध्ये नोंदणी असलेल्या डॉक्सी क्वॉइन या कंपनीच्या एजंटनी ऑगस्ट २०२२मध्ये शहरात सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर रोज ०.४ ते १ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर रोख स्वरूपात गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीचे काही दिवस परतावा देऊन कंपनीने अचानक गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वप्नील सूर्यकांत पोरे (वय २७, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.तपास अधिकारी पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केलेल्या तपासात गुन्हा दाखल असलेल्या डॉक्सी क्वॉइन कंपनीच्या एजंट्सचे पत्ते बोगस असल्याचे आढळत आहे. काही संशयितांची नावेही बनावट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.७४ लाखांची फसवणूकतक्रारदारांची संख्या वाढत असून, आणखी दहा गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. त्यानुसार फसवणुकीची रक्कम ७४ लाखांवर गेली आहे. शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला किमान २०० गुंतवणूकदार उपस्थित होते. त्यामुळे फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता तपास अधिकारी औदुंबर पाटील यांनी वर्तविली.
डॉक्सी क्वॉइनच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यासाठी आम्ही मुंबई आणि गोव्यापर्यंत जाऊन पोहोचलो आहोत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. संंबंधितांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे येऊन तक्रारी द्याव्यात. - औदुंबर पाटील, पोलिस निरीक्षक