समीर देशपांडेकोल्हापूर : अनुभवाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. दीपा फिरके यांनी पदोन्नती मिळवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्रालयातील आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे गेली पाच वर्षे हे प्रकरण दडपण्यात यश आले. मात्र, नवे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी डॉ. फिरके यांच्याविरेाधात अहवाल दिला आहे.ज्या प्रकरणामध्ये संबंधित डॉक्टरांना निलंबित केले जाऊ शकते. त्यांना उलट पदोन्नती देण्याचा ‘उफराटा’ न्याय या खात्याने राबवला आहे. डॉ. दीपा शांताराम गडकरी ऊर्फ डॉ. दीपा सचिन फिरके यांची २४ नोव्हेंबर २०११ रोजी बालरोग चिकित्सा विभागाकडे सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांची मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडे आणि नंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे बदली झाली. सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्याबाबतच्या प्रक्रियेदरम्यान याच विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. संगीता कुंभोजकर यांनी पहिल्यांदा डॉ. फिरके यांच्या अनुभवाच्या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित करून ही बाब विभागप्रमुख डॉ .सुधीर सरवदे यांच्या १८ डिसेंबर २०१८ रोजी लक्षात आणून दिली. डॉ. फिरके या चुकीच्या अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती मिळवतील आणि आपण या लाभापासून वंचित राहू या भीतीने त्यांनी ही तक्रार केली होती. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली.
तीन माजी अधिष्ठातांची सोयीची भूमिकाडॉ. कुंभोजकर यांनी २०१८ साली तक्रार केली तर नंतर २७ सप्टेंबर २०२१ रोजी मिरज शासकीय रूग्णालयातील तत्कालीन प्राध्यापक आणि सीपीआरचे अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनीही डॉ. फिरके यांच्याबाबत तक्रार केली. परंतु, २०१८ पासून डॉ. प्रकाश गुरव अधिष्ठाता येईपर्यंत एकाही अधिष्ठाताने या प्रकरणामध्ये ठोस भूमिका घेतली नाही.
तीन अधिष्ठातांनी याबाबतचे अहवालच वरिष्ठांकडे पाठवले नाहीत आणि दोघांनी कोणताही स्वयंस्पष्ट अहवाल न पाठवता मोघम अहवाल पाठवला. या सर्वांना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने पाच वर्षे झाली तरी त्यांच्यावर कारवाई तर झालीच नाही उलट डॉ. दीपा फिरके यांना पदोन्नती दिली गेली.