आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २३ : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी डॉ. डूलिटिल हा चित्रपट शाहू स्मारक भवन येथे दाखविण्यात आला. या चित्रपटाला बालप्रेक्षकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. यानिमित्ताने राजा शिरगुप्पे यांनी बालकांसाठी लिहिलेल्या पक्षीमित्र-प्राणीसखा या पुस्तकाचे प्रकाशन बालसाहित्यिक चंद्रकांत निकाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
जंगलतोड करणाऱ्या तस्करांशी प्राण्यांच्या मदतीनेच डॉ. डूलिटिल हे कशी लढाई करतात, हे सूत्र असलेल्या डॉ. डूलिटिल या चित्रपटाने चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्राण्यांशी बोलणाऱ्या डॉ. डूलिटिल यांची एडी मर्फी यांनी केलेल्या अफलातून भूमिकेमुळे हा चित्रपट अजरामर झाला होता. १९९८ मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या आतापर्यंत चार सीक्वेल तयार झाले आहेत. बालरसिकांनी हा दुसरा भाग रविवारी डोक्यावर घेतला.प्रारंभी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मिलिंद यादव यांनी पाच वर्षातील कामाचा आढावा घेतला. यावेळी राजा शिरगुप्पे यांनी लिहिलेल्या पक्षीमित्र-प्राणीसखा या पुस्तकाचे प्रकाशन बालसाहित्यिक आणि पोहाळे येथील नवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाडे यांनी आपल्या भाषणात बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी म्हणून अल्पमूल्यात पुस्तक उपलब्ध करुन देण्याच्या चिल्लर पार्टीच्या उपक्रमाचे कौतुक करुन एक बालकथा ऐकवली. चिल्लर पार्टीच्या बालरसिकांनी त्यांच्या कथेला टाळ्या वाजवून दाद दिली. सूत्रसंचालन मिलिंद नाईक यांनी केले.प्रास्तविक मिलिंद कोपार्डेकर यांनी केले. भाउ पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूरज साळोखे यांनी परिचय करुन दिला. आभार मजेठिया यांनी मानले. चंद्रशेखर तुदीगाल, महेश शिंगे, आेंंकार कांबळे, राहुल कांबळे, रोहन तुदीगाल आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहावा वर्धापनदिन
बालरसिकांच्या हस्ते केक कापून यावेळी चिल्लर पार्टीच्या सहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमात गारगोटीहून केवळ चिल्लर पार्टीच्या चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित राहिलेली जान्हवी केतकी घनश्याम ठाकूर या विद्यार्थिनीचा सत्कार चंद्रकांत निकाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सुधाकरनगर येथील झोपडपट्टीतील ८0 बालरसिक उपस्थित होते.