सरांना मी प्रथम पाहिले ते १९८४ मध्ये. मी त्यावेळी महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनचे एल.बी. जोशी हॉस्पिटलमध्ये काही काळ वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर आपणास काही चांगला अनुभव मिळावा म्हणून कार्यरत होतो. तत्पूर्वी मी सरांची काही व्याख्याने सातारा येथील आर्यांग्ल वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना ऐकली होती.
त्यावेळी मी जोशी हॉस्पिटल, पुणे येथे होतो. त्यावेळी पहाटे ५.०० पूर्वी सरांचा त्यांच्या पेशंटसाठी राऊंड होत असे. सर पेशंट कसा तपासतात आणि रुग्णाबरोबर त्यांचा घडणारा संवाद, हे पाहणे अल्हाददायक असे.
यानंतर २००९ साली मी पुणे येथे एका साखर कारखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो; पण २०११ साली कारखाना बंद पडला. त्या दरम्यान मी माझ्या एका पेशंटबरोबर त्याची प्रकृती दाखविण्याकरिता सरांच्या एरंडवणा येथील अंकुर क्लिनिकमध्ये गेलो. त्यावेळी सरांचे सहकारी डॉ. जगमोहन तळवळकर यांना विचारले. मी येथे येऊन बसलो तर चालेल का, त्यावेळी सरदेसाई यांनी मला परवानगी दिली. त्यावेळी माझे काका कै. मुरलीधर देशपांडे यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. त्यांनी मला असा सल्ला दिला. नोकरी सोडलीस तरी चालेल; पण डॉ. सरदेसाई यांच्याकडे जा. त्यावेळी आमच्या कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी मला खूप सहकार्य केले. १९८५ मध्ये सरांनी न्यूरालॉजी या विषयातून एम.डी. ही पदवी प्राप्त केली. नंतर सरांनी लंडन येथे जाऊन एम. आर. सी. पी. विशेष पदवी प्रावीण्यासह प्राप्त केली आणि त्यानंतर पुणे येथे वैद्यकीय सल्लागार म्हणून कार्यरत झाले. नंतर सर बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
सरांचे सर्व शिक्षण मुंबईत जरी झालेले असले तरी त्यांनी शिक्षणानंतर पुण्याची निवड वैद्यकीय व्यवसायाकरिता नंतरच्या कालखंडाकरिता केली. सरांची बरीच पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे पुस्तक प्रत्येक गरोदर स्त्रीने आणि भावी पित्याने आपल्या मुलाची जडणघडण कशी करावी आणि बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, याकरिता वाचण्याकरिता उत्तम पुस्तक आहे. विविध नियतकालिकातून विपुल लेखन केले. डायबेटीस असोसिएशनचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. सरांना २०११ साली पुण्यभूषण पुरस्कार, तर २०१६ साली प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्काराने गौरविले. या धन्वंतरीच्या सहवासात माझ्या आयुष्यातील काही काळ मला व्यतीत करता आला. ही माझी पूर्व जन्मातील पुण्याई असे म्हटल्यास वावगे हाेणार नाही.
-डॉ. व्ही. एच. देशपांडे (नेबापूर, ता. पन्हाळा)