कोल्हापूर : डॉ. काैस्तुभ वाईकर व डॉ. अनुष्का वाईकर यांच्याविरोधात आपण कट प्रॅक्टिस, न्युरोसर्जनची पदवी नसताना बेकायदेशीर शस्त्रक्रिया करणे, रुग्णांकडून उपचाराचे अवाच्या सवा पैसे घेणे यासारख्या गंभीर तक्रारी मेडिकल काउंन्सिल ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र मेडिकल काउंन्सिल यांच्याकडे केल्या आहेत, म्हणून त्यांनी मला मॅनेज करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला, असा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
मेडिकल काउंन्सिल ऑफ इंडियाकडे केलेल्या गंभीर तक्रारीमुळे डॉ. वाईकर दाम्पत्य आपल्याविरोधात भलतेसलते आरोप करून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे, असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. उलट मी डॉ. वाईकर यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.
सर्वसामान्य रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची केलेली लूट पाहता डॉ. वाईकर म्हणजे ॲनाकोंडा असून या बकासुराला थोपविण्यात प्राथमिक यशही आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यांच्या रुग्णालयात सुरू केलेले कोविड उपचार केंद्र बंद करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी महापालिकेला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सीमा सोनुले, सुयश माने, रणजित पाटील या रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना डॉ. वाईकर यांच्याकडून झालेली आर्थिक पिळवणूक तसेच उपचारादरम्यान आलेल्या वाईट अनुभवाचे कथन केले.